लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाबीजसह इतर काही कंपन्यांची बियाणे निकृष्ट निघाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला. बियाणे उगवलीच नसल्याने पेरणीचा पैसा व्यर्थ गेला. हे संकट टळत नाही तोच सततच्या पावसाने शेती पिके पिवळी पडू लागली आहेत. घरात काहीच सोयाबीन येणार नसल्याची चिन्हे दिसू लागल्याने उभ्या पिकामध्ये जनावरे सोडण्याचा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात घडला आहे.पिवळे पडलेले सोयाबीन, कपाशीच्या पात्या गळत असल्याचे डोळ्यासमोर दिसत आहे. सुरुवातीला पीक परिस्थिती उत्तम असताना नेमके काय घडले याचे कारण शोधत असताना बराचवेळ निघून गेला. कृषी विभागाकडून सर्वेक्षण होवून नुकसान भरपाई मिळेल ही आशा ठेवून या विभागाला पत्र दिले. मात्र साधी दखलही घेतली गेली नाही. यामुळे महागाव तालुक्याच्या बोरी(इजारा) येथील शेतकरी बाळू राठोड यांनी पिकांमध्ये जनावरे सोडली.काळूलालनगरचे विनोद चव्हाण, मादणी गावातील विकास गर्जे, नायगावचे नंदू चाौधरी आदी शेतकऱ्यांनी लोकमतकडे आपली व्यथा मांडली. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबालाही या अस्मानी संकटाला पुन्हा सामोरे जावे लागत आहे. निकृष्ट बियाण्यांची मदतही नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पदरात पडली नाही. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील बळीराजाने अखेर जनावरे पिकात सोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 2:56 PM