बळीराजाची व्यथा : महावितरण कार्यालयात नुसत्याच येरझारानांदेपेरा : वणी तालुक्यातील नांदेपेरा परिसरातील अनेक शेतकरी अद्याप वीज जोडणीपासून वंचित आहे. बळीराजा आता महावितरण कार्यालयाकडे येरझारा मारून पुरता थकला आहे. तरीही महावितरण त्यांना वीज जोडणी देण्याचे औदार्य दाखवित नसल्याने शासनानेच आता यासाठी पुढाकार घ्यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शासनाने मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर केल्या. जो शेतकरी मागेल त्याला विहीर, शेततळे देण्याची ग्वाही दिली. त्याकरिता ‘आपले सरकार’ संकल्पनेतून अर्जही उपलब्ध करून दिले. ते आॅनलाईन पद्धतीने भरावयाचे आहे. मात्र शेतकऱ्यांचा अशिक्षितपणामुळे व संगणकीकृत किचकट प्रणालीमुळे, ज्या शेतकऱ्याला गरज आहे, असेच शेतकरी विविध योजनांपासून वंचित राहात आहेत.अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळे, विहीर तयार केल्या. काही विहिरी तर कोरड्याच पडून आहे. काही विहिरींना पाणी लागले. मात्र ते अपुऱ्या प्रमाणात आहे. भूगर्भातील पाणी पातळी खालावल्याने अनेक विहिरींना पाणी लागत नसल्याने अनेक विहिरी आता कोरड्या पडल्या आहे. दुसरीकडे विहिरींना पाणी आहे. मात्र वीज पुरवठा नाही, अशी अनेक शेतकऱ््यांची स्थिती झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी वीज जोडणी मिळविण्यासाठी दोन-तीन वर्षांपूर्वी महावितरणकडे अर्ज सादर केले आहे. मात्र अजूनही बहुतांश शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी दररोज महावितरण कार्यालयात चकरा मारत आहे. महावितरणचे कर्मचारी ‘तुमचा नंबर यायचा आहे’, असे सांगून शेतकऱ्यांना आल्यापावली परत पाठवीत आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना यादीत नंबर असूनही वीज जोडणी मिळाली नाही, हे विशेष. याबाबत विचारणा केली असता, कर्मचाऱ्यांकडून कंत्राटदारांचा अवधी संपला असून नवीन कंत्राटदार येईल, तेव्हा काम सुरू केले जाईल, असे सांगितले जात आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वीज जोडणी पोहोचली नाही, अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर ऊर्जेचे कनेक्शन देण्यात येणार आहे. त्यासाठी आता काही शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. मात्र तेही अर्ज प्रलंबित असून एकाही शेतकऱ्याला सौर ऊर्जा जोडणीची डिमांड नोट मिळालेली नाही. (वार्ताहर)
शेतकरी वीज जोडणीपासून वंचितच
By admin | Published: March 14, 2016 2:41 AM