अविनाश साबापुरे, यवतमाळ : मागणीपेक्षा पुरवठा कमी असूनही गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीची लागवड कमी केली आहे. त्यामागे पाखरांकडून होणारा त्रास हे एक प्रमुख कारण आहे. परंतु, याच त्रासावर उतारा ठरणारे वाण आता शेतकऱ्यांना सापडले आहे. या ज्वारीची पूर्ण वाढ झालेले कणिस खाली झुकते. त्यामुळे पाखरांना त्यावर बसताच येत नाही. या रब्बी ज्वारीची लागवड करून यंदा विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी प्रगती साधली आहे.
ज्वारीचे पीक वाढल्यानंतर दाणेदार कणिस ताठ उभे राहते. त्यावर पाखरांचे थवेच्या थवे बसून बहुतांश दाणे फस्त करतात. ही समस्या निकाली काढण्यासाठी डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ‘पीकेव्ही क्रांती-जी’ हे रब्बी ज्वारीचे वाण शोधले आहे. त्याला उमरखेडच्या भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानने प्रचाराची जोड दिली. क्रांती-जी या वाणासह प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषीमित्र अशोक वानखेडे यांनी गावोगावी फिरून ज्वारीचे पारंपरिक वाण गोळा केले.
गेल्या आठ वर्षांपासून कृषी प्रतिष्ठानने त्याची आधी स्वत:च्या शेतात लागवड केली. त्याचे उत्तम ‘रिझल्ट’ जाणून घेतल्यानंतर आता त्यांनी हे बियाणे शेतकऱ्यांना वाटप करणे सुरू केले आहे. यंदा रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांनी विदर्भातील उमरखेड, आर्णी, महागाव या शिवारात तसेच मराठवाड्यातील हदगाव, हिमायतनगर आदी शिवारात या बियाण्याचे वाटप केले. बियाणे दिलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्याची लागवड करवून घेतली. याच ज्वारीला आता ‘उमरखेडी ज्वारी’ म्हणून ओळखले जात आहे.
कधी करावी लागवड?
खरिपातील उडीद, मूग, सोयाबीन काढल्यानंतर जमिनीची चांगली मशागत करून ही रब्बी ज्वारी लावावी. यंदाच्या रब्बीमध्ये २५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान २५० शेतकऱ्यांनी ‘उमरखेडी ज्वारी’ची पेरणी केली होती. भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानने दिलेले हे बियाणे आता विदर्भ-मराठवाड्याच्या शिवारात बहरले आहे. दाणेदार कणसं वाऱ्यावर डोलत असले, तरी त्यावर एकाही पाखराचे बस्तान बसलेले नाही.
भाकर बनते कडक आणि रुचकर -
‘उमरखेडी ज्वारी’चे कणिस खाली झुकलेले असते. त्यामुळे पाखरांचा त्रास अजिबात होत नाही. अवकाळी पाऊस झाला तरी कणसात पाणी न साचता निथळून जाते. दाणे टपोरे, रंग पांढुरका पिवळा चकचकीत असतो. या ज्वारीचे दाणे इतर बियाण्यापेक्षा कणखर असल्याने या ज्वारीची भाकर कडक आणि रुचकर बनते. ही ज्वारी अधिक दिवस साठवून ठेवली तरी खराब होत नाही.
या बियाण्याला आता शेतकऱ्यांकडून मागणी वाढत आहे. येत्या रब्बी हंगामापूर्वी कृषी विद्यापीठाने, कृषी विभागाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. त्यासाठी हंगामपूर्व नियोजन शेतकरीहिताचे होईल.- अशोक वानखेडे, अध्यक्ष, भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान, उमरखेड