मुख्यमंत्र्यांचे भावनिक आवाहन : दिलासादायक घोषणांचे संकेत यवतमाळ : शेतकऱ्यांनो राज्यातील युती सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभे आहे, तुमच्या सुख-दु:खात सरकार सहभागी आहे, तुमच्या समस्या तत्काळ सोडविल्या जातील, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील, तुम्ही धीर धरा, कोणत्याही परिस्थितीत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, कुटुंबाचा विचार करा, असे भावनिक आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथील आदर्श गाव रातचांदणा येथे केले. जिल्हा परिषदेतील अमरावती विभागीय आढावा बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री यवतमाळनजीकच्या रातचांदणा गावात पोहोचले. तेथील सरपंच कलावती ब्राह्मणकर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. फडणवीस यांनी येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शेतकरी अरविंद बेंडे यांच्या शेतातील ग्रीन शेडनेट व रेशीम प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायतीच्या आवारात फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातून शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोई तातडीने उपलब्ध करून दिल्या जातील, दीर्घ मुदती कर्ज आणि तेही बिनव्याजी देण्याचा विचार सरकार करेल, जिल्ह्यात कापसावर आधारित सूत गिरण्या, टेक्सटाईल्स पार्क उभारले जातील. जिल्ह्यात कामे सुरू आहेत की नाहीत, याची तपासणी उपग्रहाद्वारे मुंबईत बसून केली जाईल. शेतकऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा, सरकारला उपाययोजना करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मुख्यमंत्री घोडखिंडी आणि पिंपरी येथील मुक्कामासाठी रवाना झाले. तत्पूर्वी जिल्हा परिषदेसमोर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच जिल्हा दारूबंदीसाठी महिलांनी एक निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांंना दिले. (कार्यालय प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनो धीर धरा, सरकार तुमच्या पाठीशी
By admin | Published: March 04, 2015 1:46 AM