बाभूळगावचा आढावा : प्रशासनाचा प्रबोधन प्रयोग यशस्वीयवतमाळ : राज्यभरात शेतकरी आत्महत्या वाढत असताना बाभूळगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्या निरंक आहे. यामुळे जिल्ह्यापुढे एक नवा आदर्श उभा झाला आहे. ११० गावांतील प्रबोधनासह स्थानिक उपाययोजनांमुळे हे यश मिळाल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात उपाययोजना सुरू आहेत. या उपाययोजनांच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्यांमध्ये घट नोंदविण्यात आली आहे. २०१५ मध्ये जिल्ह्यात २६० शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली. २०१६ मध्ये १६७ शेतकरी आत्महत्या झाल्या. गतवर्षाच्या तुलनेत यामध्ये ४५ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.बाभूळगाव तालुक्यात २०१५ मध्ये सात शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. २०१६ मध्ये नऊ महिन्यांत आत्महत्येचा आकडा निरंक आहे. तालुक्यातील ११० गावांमध्ये होत असलेल्या सामाजिक प्रबोधनाचा हा भाग असल्याचे मत तहसीलदार दिलीप झाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. जिल्ह्यातील लाभार्थी योजना, स्पर्धा परीक्षा, विवाह मेळावे, शेतीपूरक व्यवसाय, जोडधंदे, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, फळबागा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यातून शेतकरी आत्महत्येचा कल कमी झाला आहे. जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी केवळ बाभूळगाव तालुक्यातच शेतकरी आत्महत्यांमध्ये घट नोंदविण्यात आली. उर्वरित १५ तालुक्यांची स्थिती मात्र अद्यापही जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.बाभूळगावप्रमाणे संपूर्ण जिल्हा आत्महत्यामुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. या माध्यमातून पुढील काळात आशादायी चित्र दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (शहर वार्ताहर)
शेतकरी आत्महत्या निरंकचा दावा
By admin | Published: September 21, 2016 2:08 AM