यवतमाळ : सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील रोहिणी चवरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. तिच्या यशामुळे महागाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महागाव तालुक्यातील गुंज येथील वडिलोपार्जित शेती व्यवसाय करणारे मधुकर चवरे यांची कन्या रोहिणी हिने पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयातून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले. तिने २०१९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पीएसआय पूर्व आणि मुख्य परीक्षा दिली. ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. मात्र, कोरोनामुळे मौखिक व शारीरिक चाचणी होऊ न शकल्याने तब्बल तीन वर्षांनंतर २०२२ मध्ये पार पडलेल्या मौखिक व शारीरिक चाचणी परीक्षेत उत्तीर्ण होत तिने ओबीसी महिलांमधून राज्यातून १४ वा क्रमांक पटकाविला. तिची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड करण्यात आली आहे.
रोहिणीला बालपणापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड होती. आई, वडिलांनी तिला अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच तिने यशाला गवसणी घातली आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय वडील मधुकर चवरे, आई सोनूताई, भाऊ अजय, नातेवाईक तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गिते, ताई जोशी, भाऊ जनगावे, सोळंखे (आयपीएस), उपनिरीक्षक तथा नायब तहसीलदार उत्तम पवार, इद्रीस पठाण, एसआरपीएफ मधील जोशी यांना दिले. तिच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. गुंजसारख्या खेडे गावातून महिला पोलीस निरीक्षक होऊन रोहिणी चवरे हिने महागाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.