प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील बाजार समितीत शेतकऱ्यांची दैनावस्था होत असून संचालक, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. आपलाच शेतमाल विकण्यासाठी शेतकºयांना ताटकळत राहावे लागत आहे.काही वर्षांपूर्वी दिग्रस बाजार समिती जिल्हात अव्वल होती. तालुक्यातील जवळपास ८५ गावांतील शेतकरी येथे शेतमाल विक्रीसाठी आणायचे. मात्र गेल्या काही वर्षांत या बाजार समितीच्या कारभारात अनागोंदी निर्माण झाली आहे. संचालक मंडळ आणि प्रशासनाच्या नियोजनशून्यतेने बाजार समितीचे धींडवडे निघत आहे. बाजार समितीचे जुने वैभवच लयास गेल्याचे दिसत आहे. परिणामी अनेक व्यापारी आता धान्य खरेदीसाठी समितीकडे फिरकायला तयार नाही. शेतकरीही बाजार समितीऐवजी खुल्या बाजारात शेतमाल विक्रीस प्राधान्य देत आहे. यामुळे बाजार समितीला उतरती कळा लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.पूर्वी येथील बाजार समितीत सप्ताहातील सातही दिवस शेतकऱ्यांचा राबता राहात होता. बाजार समितीचे प्रांगण शेतमालाने तुडूंब भरून राहात होते. शेतकऱ्यांच्या मालाचा दररोज लिलाव होत होता. शेतकऱ्यांना रोख चुकारेही मिळत होते. त्यावेळच्या संचालकांशी शेतकऱ्यांशी नाळ जुळली होती. त्यांनी बाजार समितीला शिखरावर नेऊन ठेवले होते. मात्र अलिकडील काळात या सर्व बाबी गायब झाल्या आहे. बाजार समितीला भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याने जुने वैभव लयास गेले आहे.सध्याचे पदाधिकारी, संचालक, सचिव यांचे सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. शेतमाल ठेवण्यासाठी गोदामांची कमतरता असताना त्याकडे लक्ष दिले जात नाही. बाजार समिती ङबघाईस येण्यासाठी संचालक मंडळ व सचिव जबाबदार असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. एकेकाळी वैभव असलेल्या या बाजार समितीचा परिसर आता वाहनतळ म्हणून उपयोगात आणला जात आहे. समितीत शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी मिळणेही दुर्लभ झाले आहे. थंड पाण्याची मशीन लागली, पण ती बंद आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शेतकरी हिताचा एकही निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरविली आहे.बाजार समितीबाहेरच धान्य खरेदी केली जाते. मात्र त्यावर समितीचे कोणतेही नियंत्रण नाही. बाजार समितीत धान्याला योग्य भाव मिळत नाही. मोठ्या व्यापारांची हुकुमशाही सुरू असल्याने बाजार समितीचा विकास खुंटला आहे. शेतकऱ्यांना योग्य वागणूक, सुविधा देण्यास बाजार समितीचे संचालक आणि प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.शेतकरी जातात दुसऱ्या जिल्ह्यातयेथील बाजार समितीच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील शेतकरी आता आपला शेतमाल दुसऱ्या तालुक्यात व जिलह्यात विक्रीस नेत आहे. मानोरा, कारंजा, मंगरूळपीर, वाशीम, अकोला आदी ठिकाणी शेतकरी शेतमाल नेत आहे. तेथील अनेक व्यापारीही थेट येथे येऊन शेतमाल खरेदी करीत आहे. काही व्यापारी येथेच नवीन बाजारपेठ सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यांचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला धोक्याची घंटा दिसून येत आहे. एकूण येथील प्रशासन आणि संचालकांच्या धोरणामुळे बाजार समितीला उतरती कळा लागली आहे.
दिग्रस बाजार समितीत शेतकऱ्यांची दैनावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 10:22 PM
येथील बाजार समितीत शेतकऱ्यांची दैनावस्था होत असून संचालक, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे.
ठळक मुद्देगोदामांचा अभाव : आवारात खासगी वाहनांचीच गर्दी