ग्रामस्थांनी लावले फलक : वेगळ्या विदर्भाचीही केली मागणीयवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे राजकारण करू नका, असा फलक बुधवारी पिंपरी गावाच्या वेशीवरच ग्रामस्थांनी लावला होता. निमित्त होते राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या दौऱ्याचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेल्या पिंपरी बुटी याच गावाला पवारांनीसुद्धा बुधवारी भेट दिली. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे केवळ राजकारण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला. यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्येचे मूळ कारण शोधण्यासाठी माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी पिंपरी बुटी गावाला भेट देऊन सर्वसामान्य नागरिकांसोबत संवाद साधला. तसेच शेतकरी, शेतमजुरांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी त्यांच्याकडे वेगळ्या विदर्भाची मागणी करून तसे फलक त्यांना दाखविले. यवतमाळ जिल्हा दौऱ्यात पिंप्री बुटीसह, भांब राजा आणि बोथबोडन या गावांनाही भेट देऊन पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पिंप्री येथे ग्रामपंचायतने लावलेल्या फलकावर शरद पवारांना शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी कापलेल्या शेअर्सची ४ टक्के रक्कम अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळाली नाही, ही रक्कम परत देण्याची मागणी करण्यात आली. सरकारने कापूस एकाधिकार योजनेत कपात केलेली तीन टक्के रक्कम परत मिळावी, त्यानंतर आत्महत्या थांबतील अशा सुचनांचे फलक लखनसिंह ठाकूर, प्रफुल बोबडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी आपल्या नावांसह लावले होते. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी वेगळया विदर्भाशिवाय पर्याय नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव देण्यात यावा याही मागण्या करण्यात आल्या. चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यांप्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन स्वामिनीच्या नेतृत्वात महिलांनी शरद पवारांकडे सादर केले. यावेळी महेश पवार, प्रज्ञा चौधरी, नितीन कापसे, अंजली चिलोरकर, मनिषा काटे, रिना घावडे, प्रशांत उगले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक असताना ६० टक्के आणेवारी जाहीर करण्यात आली, ही आणेवारी चुकीची आहे. याबाबत शरद पवारांनी स्वत: लक्ष घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.बोथबोडन येथील शेतकऱ्यांनी शरद पवार यांना आपले गाव दत्तक घ्यावे, अशी मागणी केली. यावेळी शरद पवार यांनी ही मागणी फेटाळून लावली. यामुळे ग्रामस्थांची निराशा झाली. त्यांच्या नाराजीचा सूरही व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)
शेतकरी आत्महत्येचे राजकारण करू नका
By admin | Published: September 24, 2015 3:02 AM