लोकमत न्यूज नेटवर्कवणी : हंगामाच्या सुरूवातीला शेतकऱ्यांना व्याजाने पैसे द्यायचे, हे पैसे देताना विना रकमेचे स्वाक्षरीचे धनादेश घ्यायचे, शेतातील माल हाती आला की, संबंधित शेतकऱ्यांना हेरून त्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे आपले धान्य विकण्यासाठी बाध्य करायचे. त्याद्वारे दलाली खायची, असा गोरखधंदाच काही दलालांकडून वणीत सुरू झाला आहे. यातून शेतकऱ्यांना हजारो रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळ, अशा संकटांना सामोरे जात शेतकरी आपला शेतीचा व्यवसाय तारेवरची कसरत करत सांभाळत आहे. मागील काही वर्षात पीक उत्पादनात घट आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे. अनेकदा हंगामासाठी शेतकऱ्यांजवळ पैसेच नसतात. नेमका याच संधीचा फायदा घेऊन वणी शहरातील काही धान्याचे दलाल सावकारीच्या व्यवसायात उतरले आहे. गरजवंत शेतकऱ्यांना हेरायचे, त्यांना आवश्यक असलेली रक्कम व्याजाने द्यायची, त्याबदल्यात त्यांच्याकडून विना तारखेचा, पण स्वाक्षरी असलेला धनादेश घ्यायचा. शेतीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले की, पुन्हा त्यांना गाठायचे. शेतीतून आलेले धान्य ठराविक खासगी व्यापाऱ्यांकडेच विकण्यासाठी शेतकऱ्यांना बाध्य करायचे.हंगामासाठी पैसे मिळाल्याने शेतकरीही अशावेळी हतबल होऊन दलाल सुचवेल, त्या व्यापाºयाकडे धान्याची विक्री करत असल्याचा प्रकार सध्या वणी शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. धान्य विकल्यानंतर शेतकरी संबंधित दलालाला व्याजासह पैसे परत करतो. सोबतच व्यापारीदेखिल या दलालाला त्याचे कमीशन अदा करतो. अशा दुहेरी फायद्यात सध्या दलालांचा धंदा सुरू आहे. विशेष म्हणजे या दलालांवर कुणाचेही नियंत्रण नाही. शेतकऱ्यांची गरज हेरून व्यापारीदेखिल आपल्या मनमर्जीने शेतकºयांच्या मालाला भाव देत आहे. शेतकरी दलालांच्या दबावाखाली येऊन धान्य खासगी व्यापाºयांना विकत असल्याचे चित्र वणी शहरात पाहावयास मिळत आहे.मध्यंतरी वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पथकाने वणी शहरात अवैधरित्या धान्य खरेदी करणाºया तीन व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठाणांवर धाडी टाकून कारवाई केली खरी; परंतु या कारवाईचा शहरात कोणताही परिणाम दिसून येत नाही. शहरात अनेक ठिकाणी अजूनही दलालांच्या माध्यमातून अनधिकृतपणे सोयाबीनची खरेदी सुरू आहे. एकीकडे बाजार समितीत तीन हजार रूपयांपेक्षा अधिक भाव सोयाबीनला मिळत असताना काही हतबल शेतकऱ्यांना दलालांच्या दबावात येऊन दोन हजार ५०० ते दोन हजार ८०० रूपये भावाने सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. मिळालेल्या पैशातून सावकाररूपी दलालांच्या कर्जाचा व्याजासहित परतावा शेतकऱ्यांना करावा लागतो.शेतकऱ्यांचे रक्त शोषून दलालांची विदेशवारीगेल्या काही वर्षांपासून वणी शहरात काही दलाल अनधिकृतपणे सावकारी करीत आहे. व्याजबट्ट्याच्या धंद्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर नागवल्या जात आहे. हाडाची काडं अन् रक्ताच पाणी करून शेती पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे रक्त शोषणाऱ्या या दलालांनी मध्यंतरी केलेली विदेशवारी सध्या चर्चेचा विषय आहे. या दलालांसोबत तालुक्यातील काही अवैध सावकारी करणारे कृषी केंद्र संचालकही विदेशवारीवर गेले असल्याची चर्चा आहे.
शेतकरी खासगी व्यापाऱ्यांच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:41 PM
हंगामाच्या सुरूवातीला शेतकऱ्यांना व्याजाने पैसे द्यायचे, हे पैसे देताना विना रकमेचे स्वाक्षरीचे धनादेश घ्यायचे, शेतातील माल हाती आला की, संबंधित शेतकऱ्यांना हेरून त्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे आपले धान्य विकण्यासाठी बाध्य करायचे.
ठळक मुद्देसोयाबीन उत्पादक हतबल : अवैध सावकारी करणाºया दलालांचा दबाव