फोटो
के.एस. वर्मा
राळेगाव : प्रदीर्घ काळानंतर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नवे संचालक आणि पदाधिकारी निवडून आले. नव्यांकडून बँकेच्या ग्राहकांना अनेक अपेक्षा आहे.
ग्राम विविध कार्यकारी सोसायट्या वर्षानुवर्षे काही मोजके अपवाद वगळता, कर्जवाटप व कर्जवसुली हे एकमेव काम करीत आहे. संपूर्ण जिल्हाभर पसरलेल्या बँकेच्या या नेटवर्कच्या माध्यमातून आणखी काही ग्राहकसेवा व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून द्याव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बँकेने संपूर्ण जिल्हाभरातील लाखांवर ग्राहकांना, सभासदांना एटीएम कार्डचे वाटप केले आहे. राळेगाव तालुक्यात चार हजार भागधारक ग्राहकांना एटीएम कार्ड देण्यात आले आहे. त्याची २०० रुपये फी खात्यातून परस्पर वळती करण्यात आली, पण आजपर्यंत बँकेने स्वत:चे एकही एटीएम उघडलेले नाही. निदान बँकेच्या शाखा असलेल्या ठिकाणी तरी एटीएम सुरू करून ग्राहकांना ग्रामस्तरावर सेवा मिळणे अपेक्षित आहे.
अनेक राष्ट्रीयकृत बँकांनी वरिष्ठ नागरिकांना घरपोच बँक सेवा देण्यास सुरुवात केली आहे. पोष्टमन गावात नागरिकांना घरपोच पैसे पोहोचवित आहे. सहकारी बँकेनेही सेवेत विस्तार करण्याची गरज आहे. ग्राहकांकरिता मदत सेवा केंद्र सुरू करणे काळाची गरज आहे.
नियमित कर्जफेड करणारे, कर्जमाफीचा लाभ मिळालेले व नवे सभासद या तीन वर्गांतील शेतकऱ्यात पीककर्ज मर्यादा वाढीत भेदभाव होत असल्याची ओरड आहे. त्यांच्याकडून कर्जवाटपात समानतेची अपेक्षा केली जात आहे.
बॉक्स
शेतकऱ्यांना सुविधा हव्या
बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांना, ग्राहकांना बसण्यासाठी आरामदायी आसनव्यवस्था, पिण्याचे थंड पाणी, पंखे, कूलर, गर्दीच्या काळात उन्हापासून संरक्षणासाठी सावलीचे शेड आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन दिलासा देण्याची आवश्यकता आहे. राळेगाव या तालुका ठिकाणच्या बँकेत अनेक वर्षांपासून शेतकरी व ग्राहकांकरिता बसण्यासाठी सिमेंटचे बाकडे आहे. त्याच वेळी संचालकांच्या सुविधेच्या नावावर काही वर्षांपूर्वी आलिशान एसी विश्रामगृह बांधण्यात आलेले आहे.
बॉक्स
विस्तार करण्याची प्रतीक्षा
बँकेने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी व व्यवसाय वाढीसाठी गोडाऊन, वखारी व शीतगृहे बांधून सेवेत विस्तार करण्याची प्रतीक्षा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर याच परंपरागत पीक पॅटर्नमध्ये वर्षानुवर्षे अडकले आहे. सिंचनाच्या सुविधेत लक्षणीय वाढ झाली असल्याने, नवीन, जादा उत्पादन व जादा नफा मिळवून देणाऱ्या पीक पॅटर्नची माहिती शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामापूर्वी प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांची प्रगती झाल्यास बँकेचीही प्रगती होऊ शकेल.