राळेगाव : गतवर्षी कपाशीला चांगला दर मिळाल्याने यावर्षीच्या खरिपात कपाशीचा पेरा वाढला. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सुरुवातीला बसला असला तरी बहुतांश शेतकऱ्यांना कापसाचे बऱ्यापैकी उत्पादन झाले. मात्र हमी भाव गतवर्षीपेक्षा फारसा वाढला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सुरुवातीपासूनच कपाशीला तीन हजार ७५० रुपयांपासून दर सुरू केला. या काळापर्यंत गरजू शेतकऱ्यांनी आपला माल त्यांना विकला होता. याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. तालुक्यात कपाशीचे उत्पादन घेणारे अनेक शेतकरी होते. मात्र घटते उत्पादन आणि दर यामुळे त्यांचा कल सोयाबीनकडे वळला. अनेक वर्षपर्यंत तालुक्याचा सोयाबीनचा पेरा वाढत राहिला. मात्र २०१३ च्या खरिपातील कपाशीच्या उत्पादनाला पाच हजारापर्यंत दर मिळत गेला. काही भागात तर पाच हजार ५०० रुपयांवर कापूस जावून पोहोचला. २०१४ च्या खरिपातील उत्पादनालाही एवढाच किंवा त्यापेक्षा कमी-अधिक दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे कपाशीचा पेरा वाढला. खरिपाच्या सुरुवातीला या शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला. सुरुवातीला उशिराने झालेला पाऊस, यानंतर अधिक तर पुढे गरजेच्यावेळी पाऊस झाला नाही. त्यामुळे कपाशीचे उत्पादन घटण्याची स्थिती निर्माण झाली आणि झालेही तसेच. काही शेतकऱ्यांना तर लागवड खर्चाइतकेही उत्पादन झालेले नाही. ज्यांना साधारण उत्पादन झाले त्यांना कमी दराचा फटका बसत गेला. गरजू शेतकऱ्यांनी सुरुवातीला आपला कापूस व्यापाऱ्यांना विकणे सुरू केले. व्यापाऱ्यांनी तीन हजार ५०० पासून कापसाची खरेदी सुरू केली. यानंतर मात्र सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली. त्यावेळी मात्र व्यापाऱ्यांनी आपला दर वाढविला. तोपर्यंत बराचसा कापूस व्यापाऱ्यांच्या घशात गेला होता.सीसीआयनेही सुरुवातीला चार हजार ५० रुपयांपर्यंत दर दिला. पुढे मात्र भाव घसरविला. या प्रकारात शेतकरी मोडला गेला. आताही सीसीआयकडून चांगल्या कापसालाच तीन हजार ९०० ते तीन हजार ९५० पर्यंत दर दिला जात असल्याने नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. शिवाय कट्टी हा प्रकारही वाढीस लागला असल्याने क्विंटलमागे तीन ते चार किलोचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. राळेगाव तालुक्यालगतच्या मात्र परजिल्ह्यातील कापूसही या तालुक्यातच विक्रीसाठी आणला जात आहे. खैरी, वाढोणाबाजार आणि राळेगाव येथे सीसीआयची खरेदी सुरू आहे. तालुक्यातील आणि परजिल्ह्यातील कापसाची आवक वाढली आहे. अशातच सीसीआयच्या खरेदीमध्ये अनियमितता आहे. परिणामी गरजू शेतकऱ्यांना आपला कापूस व्यापाऱ्यांकडे देण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सीसीआयने कापूस खरेदीत सातत्य ठेवावे, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)
घटत्या दराचा शेतकऱ्यांना फटका
By admin | Published: February 23, 2015 12:19 AM