सावळी सदोबा : तहसील कार्यालय मंजूर करावे, नवीन रेशनकार्ड तत्काळ मिळावेसावळी सदोबा : आर्णी तालुक्याच्या सावळी-पळशी जिल्हा परिषद मतदार संघातील शेतकरी, शेतमजूर, निराधार आणि वृद्धांनी आपले प्रश्न घेऊन येथील नायब तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. मागण्या मंजूर न झाल्यास ९ आॅगस्ट क्रांती दिनापासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. पाऊस लांबल्याने बहुतांश शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये रोख मदत तत्काळ द्यावी, ही प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांची होती. महसूल आणि वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या लोकाां मालकी पट्टे द्यावे, भोगवट वर्ग २ च्या जमिनीचे वर्ग १ मध्ये रुपांतर करावे, रस्त्याचे डांबरीकरण, खडीकरण तत्काळ करावे, भारनियमन बंद करून वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान दरमहा दोन हजार रुपये करावे, सर्व्हेक्षण करून सर्व कुटुंबांना नवीन रेशनकार्ड द्यावे, सावळी येथे तहसील कार्यालय मंजूर करावे, मंजूर झालेल्या सर्व आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे काम सुरू करावे, जनावरांसाठी चाराडेपो सुरू करावा आदी मागण्या निवेदनात नमुद करण्यात आल्या आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, रामराव राठोड, डॉ. दीपक थूल, अशोक पाटील जगताप, विजय मालू आदींनी मार्गदर्शन केले. तहसीलदार सी.एन. कुंभलकर, विद्युत मंडळाचे कनिष्ट अभियंता राजेंद्र सावते यांना निवेदन देण्यात आले. प्रसंगी घाटंजीचे ठाणेदार रमेश येडमे, पारव्याचे ठाणेदार संजय शिरभाते आदी उपस्थित होते. मोर्चात सावळीचे माजी सरपंच शेषराव मुनेश्वर, आकाश राठोड, प्रल्हाद जाधव, श्यामराव देवकते, गोविंद जाधव, प्रशांत मिरासे, अनिल जाधव, विलास गेडाम, दुर्गेश वानखडे, सीताराम शिंदे, बेबी दरोडे, भोपीदास जाधव, श्रीराम मंडाले, सुरेश पवार, दादाराव वानखडे, रमेश राघोर्ते, बंडू वाघमोडे, विकास गोळेकर, सीताराम गावंडे आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
शेतकरी, शेतमजूर आणि वृद्धांचा मोर्चा
By admin | Published: July 21, 2014 12:24 AM