अविनाश साबापुरे।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शेतकऱ्यांना स्वाभिमान मिळवून देण्याचा दावा करीत शासनाने यवतमाळात कृषी महोत्सव भरविला आहे. मात्र, याच दिमाखदार कृषी महोत्सवाच्या काठावर शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी शेतकरीपुत्रांनी अन्नत्याग आंदोलन करून शासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. परंतु, व्यवस्थेचा कोडगेपणा इतका पराकोटीला पोहोचलेला आहे, की महोत्सवात शेतकऱ्यांसाठी भाषण ठोकणारे राजकीय धुरीण अन्नत्याग आंदोलनाकडे साधी नजर वळवून बघायलाही तयार नव्हते. यवतमाळच्या समता मैदानावरच व्यवस्थेतील ही धडधडीत विषमता सोमवारी चव्हाट्यावर आली.महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या घडून सोमवारी ३२ वर्षे पूर्ण झाली, तरीही शेतकºयांची अवस्था सुधारलेली नाही. अन् शेतकºयांनीही शेती सोडलेली नाही. म्हणूनच पहिल्या आत्महत्येचे स्मरण करीत सर्व शेतकरीवर्गाविषयी कृतज्ञता म्हणून सोमवारी सूर्योदय ते सूर्यास्त अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात आले. किसानपुत्र आंदोलन समितीच्या पुढाकारात सुरू झालेल्या या आंदोलनात पाहता-पाहता विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही उडी घेतली. चिखली डोमगावचे शेतकरीही येऊन सामील झाले. चिलगव्हाण (ता. महागाव) येथे साहेबराव पाटील करपे या शेतकऱ्याने १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली. तेथून पुढे शेतकरी आत्महत्यांचा काळा इतिहास सर्वज्ञात आहे. पण लाखोंचा पोशिंदा असलेला शेतकरी लाखोंच्या संख्येत मरतोय तरी व्यवस्था झूल झटकायला तयार नाही. म्हणून शेतकरीपुत्रांनी ‘अन्नत्याग’ सुरू केला.तिरंगा चौकात सरकारच्या, समाजाच्या संवेदना जागवित शेतकरीपुत्र दिवसभर उपवाशी बसले. ना कोणते नारे, ना घोषणा. मूक आक्रोश. याच आंदोलनाच्या मागे समता मैदानात सरकारी कृषी महोत्सवाचा जल्लोष सुरू होता. शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य, बचतगटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ अशी रेलचेल होती. सोबतच शेतकऱ्यांसाठी भाषणांची चंगळ होती. त्यातले कोणीही अन्नत्याग आंदोलनाची वास्तपूस्त करण्यासाठी फिरकले नाही. आत मधाळ भाषणाचे ओठ अन् बाहेर उपाशी शेतकऱ्यांचे पोट, असा विरोधाभास यानिमित्ताने चव्हाट्यावर आला. मात्र, आंदोलकांनी आपला आक्रोश निवेदनाच्या रूपात थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे.किसानपुत्र आंदोलन समितीचे प्रा. डॉ. रमाकांत कोलते, प्रा. घनश्याम दरणे, दिनकरराव चौधरी, चंद्रशेखर चौधरी, बिपीन चौधरी, डॉ. चेतन दरणे, सुधीर जवादे, प्रा. डॉ. प्रदीप राऊत, प्रा. विजय गाडगे, अजय किन्हीकर, सदाशिवराव गावंडे, मनोज रणखांब, घनश्याम अत्रे, अरुण ठाकूर, शेखर सरकटे, प्रकाश घोटेकर, रितेश बोबडे, अविनाश गोटफोडे, किशोर बाभूळकर, सुभाष लावरे, वैभव पंडित, समीर जाधव, वर्षा निकम, श्रद्धा जाधव, प्रा. कल्पना राऊत, विजय कदम आदींसह प्रतिसाद फाउंडेशन, युवा परिवर्तन, जनमंच, सेंटर फॉर अवेअरनेस, बेंबळा कालवे संघर्ष समिती, यवतमाळ जिल्हा शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनीही उपवास पाळला.सुकाणू समितीचेही आंदोलनविविध शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फेही सोमवारी तिरंगा चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. स्वामिनाथन आयोग, खरेदी केंद्र, सरसकट कर्जमाफी, बोंडअळीग्रस्तांना मदत अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. या आंदोलनात किसान सभेचे हिंमत पाटमासे, मनिष इसाळकर, गुलाब उमरतकर, निरंजन गोंधळकर, रमेश मिरासे आदी सहभागी झाले होते.चिलगव्हाण येथे काळ्या रांगोळी काढून संवेदनामहागाव : सहकुटुंब आत्महत्या करणाऱ्या साहेबराव पाटील करपे यांच्या महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथे सोमवारी चुलही पेटली नाही. गावकऱ्यांनी आपल्या घरासमोर काळ्या रांगोळी काढून आंदोलनात सहभाग नोंदविला. सोमवारी सकाळपासूनच साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी अनेकांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. चिलगव्हाण येथील साहेबराव पाटील करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी वर्धा जिल्ह्यातील दत्तापूर आश्रमात पत्नी व चार चिमुकल्यांना विषयुक्त अन्न दिले व स्वत:लाही संपविले. ही महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या होती. या घटनेला आज ३२ वर्ष झाले आहे. त्यानंतरही त्यांच्या आत्महत्येच्या आठवणी ताज्या झाल्याची चिलगव्हाण मूकआक्रंदन करते. गतवर्षी अन्नदात्यासाठी अन्नत्याग हे आंदोलन करण्यात आले. यंदा हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचले. ज्या गावच्या शेतकऱ्याने पहिली आत्महत्या केली तेथे आज कुणाच्याही घरात चूल पेटली नाही. गावकऱ्यांनी काळ्या रांगोळी काढून आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी आमदार राजेंद्र नजरधने, योगी श्यामबाबा भारती, जगदीश नरवाडे, मनीष जाधव आदींनी चिलगव्हाणला भेट दिली. यावेळी सरपंच पंजाबराव जाधव, विलास मंदाडे, पोलीस पाटील आणि गावकºयांनी एकत्रित बैठे आंदोलन केले.
कृषी महोत्सवाकाठी शेतकरीपुत्रांचा अन्नत्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:14 PM
शेतकऱ्यांना स्वाभिमान मिळवून देण्याचा दावा करीत शासनाने यवतमाळात कृषी महोत्सव भरविला आहे. मात्र, याच दिमाखदार कृषी महोत्सवाच्या काठावर शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी शेतकरीपुत्रांनी अन्नत्याग आंदोलन करून शासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.
ठळक मुद्देकिसानपुत्र आंदोलन समिती : पहिल्या शेतकरी आत्महत्येचे स्मरण अन् काळ्या आईविषयी कृतज्ञता