फोटो
पुसद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी व अडत्यांची दादागिरी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या राखीव जागेवर अडत्यांच्या मालाच्या थप्यावर थप्या आणि शेतकऱ्यांच्या मालाचा रस्त्यावर लिलाव केला जात आहे.
येथील बाजार समितीच्या यार्डमध्ये अनेक वर्षांपासून व्यापाऱ्यांनी विकत घेतलेल्या मालाच्या थप्यावर थप्या लागतात. शेतकऱ्यांना स्वतःचा माल मात्र रोडवर टाकावा लागत आहे. याकडे बाजार समितीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचे लक्ष नाही. याबाबत सहाय्यक निबंधकांना विचारणा केली असता यार्डमधील व्यापाऱ्यांनी विकत घेतलेल्या मालाच्या थप्या उचलण्याचे काम आमचे नाही, असे सांगितले जाते. हे काम सचिवांचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याविषयी सचिव तथा कर्मचाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते बाहेरगावी आहेत, असे सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गुरूवारी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष त्यांची भेट घतली. सहाय्यक निबंधक सुनील भालेराव व सचिव भाऊ मगर यांनी स्वतः बाजार समिती यार्डची पाहणी केली. त्यात यार्डमध्ये शेतकऱ्यांच्या मालाऐवजी व्यापाऱ्यांच्या मालाच्या थप्यावर थप्या शेडमध्ये आढळून आल्या. विशेष म्हणजे समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर प्रभारी सचिव पदावर कसे, असा प्रश्न आहे. सचिव मगर यांना नागपूर उच्च न्यायालयाने पदमुक्त केल्यानंतर ते त्याच खुर्चीचे मालक कसे, असा प्रश्न आहे. त्यामुळे बाजार समितीमधील कारभाराची सखोल चौकशी करण्याची अपेक्ष व्यक्त केली जात आहे.
बॉक्स
शेतकऱ्याने दिला अन्नत्यागाचा इशारा
भाजी मंडईमधून प्रत्येक शेतकऱ्याकडून २० रुपये दलालाच्या माध्यमातून दररोज लिलाव झाल्याबरोबर वसूल केले जातात. त्याची पावती दिली जात नाही. शेतकऱ्यांना समितीत कोणत्याही सुविधा नसून उन्हातान्हात त्यांना आणलेला शेतमाल रोडवरच टाकावा लागतो. यार्डमध्ये पाय ठेवण्यापुरतीही जागा नाही. यार्डमध्ये व्यापाऱ्यांचाच माल भरून आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून ११ वाजताचा लिलाव दुपारी ३ वाजता केला जातो. आता पाच दिवसांच्या आंत व्यापाऱ्यांच्या थप्प्या न उचल्यास अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी बळवंत मनवर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.