फोटो
पुसद : शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागून, त्यात घरात ठेवलेले भुईमुगाचे पीक व अन्य साहित्य जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी सकाळी शहरालगतच्या मुंगसाजीनगर के.डी. जाधव तांडा येथे घडली.
शेख जाफर शेख अहेमद (५५) रा.गढी वाॅर्ड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी मुंगसाजीनगर येथील आपल्या शेतात शेतमाल साठविण्यासाठी व राहण्यासाठी घर बांधले आहे. याच घरात मंगळवारी पहाटे अचानक शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. नुकतेच निघालेले भुईमुगाचे पीक या आगीत खाक झाले, तसेच अलमारी, कपाट, कूलर, कपडे अशा साहित्याचीही राखरांगोळी झाली. यात जवळपास चार लाखांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली. कैलास वैद्य यांना आगीचे लोळ दिसल्यानंतर त्यांनी शेतकऱ्याला माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ता सय्यद जहिरोद्दीन यांच्यासह गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. शेख जाफर यांनी शहर पोलिसांसह तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी यांना निवेदन देऊन पाहणी करण्याची मागणी केली. नुकसानभरपाईचीही मागणी केली.