मूलभूत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष
पांढरकवडा : तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील अनेक गावे आजही मूलभूत सुविधापासून वंचित आहेत. गावात अद्याप अनेक समस्या ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे नागरिकांना विकासासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पुलाला कठडे बसविण्याची मागणी
पांढरकवडा : तालुक्यातील अनेक नाल्यावरील पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलावर कठडे लावण्याची मागणी होत आहे, तर काही नाल्यावरील संरक्षण कठडे तुटले आहे. त्यामुळे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन नव्याने कठडे बांधावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शासकीय कार्यालये, बँकांत नाही वाहनतळ
पांढरकवडा : येथील बहुतांश शासकीय कार्यालये, विविध बँकांमध्ये दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्थाच करण्यात आली नाही. परिणामी वाहनचालक रस्त्यावरच आपली वाहने उभी करत आहेत. त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. संबंधित कार्यालय व बँकांनी ग्राहकांच्या सुविधेसाठी वाहनतळ उभारावे, अशी मागणी केली जात आहे.
निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार
मारेगाव : अल्पावधीतच नगरपंचायतीच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू होणार असून, नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी यांना दिला आहे. त्यामुळे लवकरच या निवडणुका होणार असल्याने इच्छुकांची गेल्या एक वर्षापासूनची प्रतीक्षा आता संपली आहे.
राज्य मार्गावरील हायमास्ट लाइट बंद
मारेगाव : वणी-यवतमाळ या मुख्य राज्य मार्गावर करणवाडी आणि गौराळा याठिकाणी वाहनचालकांच्या विश्रांती स्थळावर लावण्यात आलेले हायमास्ट लाइट गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे याठिकाणी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे हे लाइट सुरू करण्याची मागणी होत आहे. तसेच अनेक सौर ऊर्जेवरील पथदिवे बंद अवस्थेत असून त्याच्या बॅटऱ्यासुद्धा चोरट्यांनी लंपास केल्या.
सांडपाण्यासाठी भूमिगत व्यवस्था करा
मारेगाव : शहरातील सांडपाण्याच्या नाल्या उघड्या असल्याने आणि नसल्याची नियमित सफाई होत नसल्याने नाल्याजवळ मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तयार झाली आहे. त्यामुळे नागरिकांना तेथे साधे उभे राहणेदेखील कठीण जात आहे. तसेच डासांच्या संख्येत वाढ होऊन साथीच्या आजारात वाढ झाली आहे. त्यामुळे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या झाकाव्या, अशी मागणी केली जात आहे.