लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागील महिनाभरापासून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाने दिलासा दिला आहे. सोमवारी दिवसभर झालेल्या पावसानंतर मंगळवारी सकाळीही जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२.७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक ५४.३ मिमी पाऊस बाभुळगाव तालुक्यात झाला असून, सर्वांत कमी ४.५ मिमी पाऊस उमरखेडमध्ये नोंदविला आहे. यवतमाळ तालुक्यात ४७ मिमी, कळंब ३०.७, दारव्हा ३४.५, दिग्रस १५.२, आर्णी १६.१, नेर ३५.६, पुसद ९.१, महागाव ९.७, वणी ९.१, मारेगाव ९.१, झरीजामणी ३१.५, केळापूर १३.४, घाटंजी ३४, तर राळेगाव तालुक्यात १७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ९ लाख ५८ हजार हेक्टर आहे. त्यातील ३ लाख ३८ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या होत्या. मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे या पेरण्यांना आता वेग आला आहे.दरम्यान, पुढील काही दिवसात जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी तातडीने आढावा बैठक घेवून यंत्रणेला विविध सूचना केल्या.