लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन त्वरित करण्यात यावे, या मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग शेतकरी कृती समितीने गुरुवारी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी मागण्या तत्काळ मान्य करा, असा टाहो फोडीत शेतकऱ्यांनी संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली.
राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांचा विचार लक्षात घेत शेतकऱ्यांची प्रगती साधण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग पूर्णत्वास नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, या संदर्भात केवळ घोषणा झाली. परंतु, त्याची कृती झाली नाही. यामुळे शेतकरी संतापले आहेत. गावाचा आणि शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी हा महामार्ग महत्त्वाचा आहे. या महामार्गामुळे दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत. यामुळे कुठलाही वेळ न दवडता तत्काळ अवलंब करीत या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या नावाखाली काही विकासविरोधी नेत्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र, शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध नाही. त्याला समर्थन आहे. या प्रकल्पासाठी जमिनी भूसंपादित करताना प्रथम शेतकऱ्यांशी चर्चा करून बाजारमूल्याच्या पाच पट अधिक दराने शेतजमिनीची खरेदी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. जेव्हा शेतकरी शासनासाठी शेतजमीन द्यायला तयार आहे. तेव्हा शासनानेसुद्धा मोबदला देताना आखडता हात घेऊ नये, असेही आंदोलकांनी यावेळी सांगितले. याबाबतच निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय ढोले, उपाध्यक्ष गजानन आडे, सचिव विनोद ठाकरे, रामेश्वर जाधव, सुशील जयस्वाल, सिद्धार्थ कुळसंगे, देवानंद गावंडे, लेकचंद पवार, विनायक आडे, नीलेश आचमवार, प्रकाश बुटले, अंजली माळवी, विकास चव्हाण, प्रदीप पवार, रोहिदास राठोड, कार्तिक जाधव, संतोष आडे, ललित कांबळे, यांच्यासह अनेक जण आंदोलनात सहभागी झाले होते.