मागील वर्षीपेक्षा यंदा सोयाबीन बियाण्यांचे दर प्रचंड वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पेरणी आधीच कंबरडे मोडले. महाबीजने शेतकऱ्यांना ऑनलाइन बुकिंगचे आवाहन केले होते. त्यानुसार सोयाबीन उत्पादकांनी १५८ या वाणाची बुकिंग केली. परंतु हे बियाणेच दुकानदारांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाण्यांसाठी फरपट होत आहे.
दुकानदारांनी बुकिंग केलेल्या सोयाबीन बियाण्याच्या मोबदल्यात अन्य दुसरे बियाणे घेतले. महाबीजने यंदा केवळ दहाच थैल्या दिल्या आणि त्या आम्ही केव्हाच विकून मोकळे झालो, असे दुकानदार सांगत आहे. हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे यंदा सोयाबीन बियाणे उत्पादित करू शकलो नसल्याचे महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकाने सांगितले. त्यांनी महाबीजची पाठराखण केली. खासगी कंपन्यांना बीजोत्पादन करता येते, मग शासनाच्या महाबीजला बियाणे का उत्पादित करता आले नाही, हा प्रश्न आहे. खासगी कंपन्यांशी ‘अर्थपूर्ण’ मैत्री साधून अन्नदात्याचे पेरणी आधीच कंबरडे मोडणाऱ्यांवर कारवाईची गरज असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.
बॉक्स
ज्या बियाण्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते, त्याच बियाण्याची शेतकरी निवड करतात. परंतु यंदा मात्र बेभरवशाचे बियाणे पेरणे म्हणजे वरळी मटका लावण्यासारखे आहे. महाराष्ट्र शासनाचे अधिकृत असलेले महाबीज महामंडळ गुणवत्तापूर्ण, चांगली उगवणशक्ती असलेले बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. महाबीजच्या बियाण्यावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या बियाण्याची मोठी मागणी असते.
मागील वर्षी उगवण शक्तीबाबत जिल्ह्यात तब्बल १२ हजार शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्या प्रलंबित आहेत. या संदर्भात कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मीटिंग सुरू असल्याचे सांगत दोन दिवसांपासून बोलण्याचे टाळले आहे.