लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : महागाव तालुका कृषी विभागाच्या कारभाराने शेतकऱ्यांची महाबीज बियाण्याकरिता फरपट सुरू आहे. महाबीजचे सोयाबीन बियाणे मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने अनेक शेतकरी आंध्रप्रदेश, तेलंगणामध्ये बियाणे खरेदीसाठी धाव घेत आहेत.
अंबोडा येथील काही शेतकऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून सोयाबीनचे बियाणे खरेदी केले. बीटी कपाशी बियाणे व महामंडळाच्या सोयाबीन बियाण्यामुळे खरिपाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. तालुक्यात अनेक कृषी केंद्रांत बियाण्याचे दर पत्रक लागले नाही. कोणत्या मालाचा किती स्टॉक आहे, याचाही बोर्ड दर्शनी भागावर नाही. बियाणे खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला ‘मार्जिन’ असलेले बियाणे माथी मारले जात आहे.
कृषी विभागाच्या भरारी पथकाने अद्याप कृषी केंद्रांना भेटी दिल्या नाही. काळी दौ. सर्कलमध्ये काही मोजक्या कृषी केंद्रांचे नमुने घेतले जात आहेत. शहरातील दोन, तीन ठोक कृषी केंद्र संचालक गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम करीत आहेत. त्या कृषी केंद्रांविषयी अनेक तक्रारी आहे. कृषी अद्याप त्यांच्यावर ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. बनावट बियाणे व बोगस औषधी विक्रीच्या माध्यमातून काही कृषी केंद्र संचालकांनी अल्पावधीत आपल्या मालमत्तेत कोट्यवधी रुपयांची भर घातली आहे. त्यांच्यावर आयकर विभागही मेहेरबान आहे.
लाखोंची मार्जिन आणि विदेशी टूर याचा लाभ सर्वाधिक शहरातील काही कृषी केंद्र संचालकांनी घेतला आहे. काही अतिउत्साही कृषी केंद्र संचालकांनी विदेशी टूरवरील आपल्या कुटुंबासोबत मौजमजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. स्वतःच्या लाभाकरिता शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व अल्पावधीत कोट्यधीश झालेल्या कृषी केंद्र संचालकांचा आयकर विभागाने शोध घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.