लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भात मान्सूनचे आगमन झाले आहे. प्रारंभीचा टप्पा मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटांसह आहे. अशा परिस्थितीत पेरणी केल्यास अतिपावसामुळे पेरण्या वाहून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे तूर्त १७ जूनपर्यंत पेरण्या थांबवाव्यात, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १३ जूनपर्यंत जोरदार पाऊस आणि वादळवारा राहणार आहे. यासोबतच विजाही पडतील असा अंदाज आहे. काही भागांमध्ये पाऊस जास्त सांगण्यात आला आहे तर काही भागांमध्ये कमी पाऊस आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पहिल्याच पावसात सर्वत्र दाणादाण पाहायला मिळत आहे. त्यामुळे पेरणीची घाई न करता शंभर मि.मी. पाऊस झाल्यानंतर योग्य ओलाव्यासह पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यामध्ये सध्या २४ हजार ४४० हेक्टरवर खरिपातील पेरण्या आटोपल्या आहे. त्यामध्ये ५५३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे तर १९ हजार ९०० हेक्टरवर कापसाची टोबणी झाली आहे. तीन हजार ९८७ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. एकूणच पेरणीच्या कामाला वेग आला आहे. यासोबतच पावसाचाही प्रचंड वेग आहे. त्यामुळे पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका आहे. शेतात पुरेशी ओल तयार झाल्यानंतर पेरणी केली तर त्याचा धोका होत नाही, पेरलेले बियाणे निघून येते. अतिपावसामध्ये या पेरण्या झाल्या तर त्या दडपण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधानता पाळीत तूर्त पेरण्या लांबाव्या, असा इशारा कृषी विभागाने हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिला आहे.जिल्ह्यात बियाणे आणि खतांची मुबलकता आहे. काही बियाणे उपलब्ध व्हायचे आहेत तर काही बियाणे पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित बियाणे उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. याशिवाय पेरणीचे नियोजन करण्यासाठी लागणारा पैसा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांमध्ये गर्दी केली आहे. प्रत्येक बँकेमध्ये ही गर्दी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी नेटवर्कचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे- जिल्ह्यामध्ये साडेचार लाख हेक्टरवर कापसाची लागवड होणार आहे. त्यापैकी १९ हजार ९०० हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. सर्वाधिक लागवड कळंब तालुक्यात झाली आहे. यावरून कापसाचे लागवड क्षेत्र यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार १३ जूनपर्यंत विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज प्रत्येक ठिकाणी खरा ठरेल असे नाही. मात्र, शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेता १७ जूनपर्यंत पेरणी करणे टाळावे. त्यानंतर पेरणी करावी. या काळात तासी ३० ते ४० किलाेमीटर वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक, यवतमाळ
शेतकऱ्यांनी पुढील परतीच्या पावसाचा अंदाज घेत प्रथम कापसाची लागवड करावी, त्यानंतर सोयाबीनची लागवड करावी. लागवड करताना सोयाबीनच्या पेरणीसाठी घाई करू नये. प्रक्रिया करूनच बियाणे वापरावे.- डॉ. प्रमोद यादगीरवारसहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळ.