आर्णी : आता शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाचा पेरा स्वत:च नोंदविता येणार आहे. मोबाईल ॲपवरून त्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ तर कधी दुबार पेरणीचे संकट येते. यात पिकांचे मोठ्य़ा प्रमाणात नुकसान होते. नुकसान झालेल्या पिकांची मोका पहाणी होत नसल्याने नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही.
दरवर्षी पिकांचा विमा काढला जातो. पिकांचे नुकसानही होते. परंतु मोका पहाणी होत नसल्याने नुकसान झालेल्या पिकांची नोंद होत नसल्याने भरपाई मिळत नाही. ही समस्या लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने पीक पाहणीकरिता एक स्वतंत्र ई-पीक सर्व्हेक्षण ॲपची निर्मिती केली. हा ॲप ॲन्ड्राईड मोबाईलमध्ये डाऊनलोड करून स्वतःच्या पिकांची स्वतःच नोंदणी करून शेतकऱ्यांना पेरा, सातबारामध्ये भरता येणार आहे. त्यामुळे आता स्वतःच स्वतःच्या शेताचे सर्व्हेअर व्हा, असे आवाहन तहसीलदार परशराम भोसले यांनी केले. त्यांनी तालुक्यातील इचोरा येथील रामधन पवार यांच्या शेतात ई-पीक पाहणी करून पेरा नोंद घेण्याचे प्रशिक्षण तलाठी दिलीप सकवान यांनी दिले. यावेळी नायब तहसीलदार उदय तुंडलवार व शेतकरी उपस्थित होते.