यवतमाळ : नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे शार्ट सर्कीटने चार एकर उसाच्या शेतीला आग लागली. या आगीत आठ लाखाचा ऊस जळून खाक झाला. दरम्यान नेर नगर परिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी दोन तास उशिरा पोहोचल्याने याठिकाणी तणाव निर्माण झाला. उसाला लागलेली आग पाहून एका शेतकऱ्याच्या मुलाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
नेर तालूक्यातील मांगलादेवी येथील शेतकरी रमेश नथ्थूजी दहेकार (वय ५५) यांनी शेतात चार एकर उसाची लागवड केली होती. सदर उसाची तोडणी २० नोव्हेंबरला होती. मात्र बुधवारी उसावरून गेलेल्या विद्युत वाहिनीचे स्पार्किंग झाल्याने ही आग लागली. यावेळी नेर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला पाचरण केले. अग्निशामक दल पोहोचल्यावर शेतात जाण्याकरीता योग्य रस्ता नसल्याने दोन तास खोळंबले. यामुळे शेतातील जमलेला जमाव संतप्त झाला. यानंतर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी दिलेल्या आदेशानंतर अग्निशामक दल शेतात पोहोचले. मात्र ऊस तोपर्यंत जळून खाक झाला होता.
उसाला लागलेली आग पाहून रमेश दहेलकर यांचा मुलगा सुजित दहेलकर याने शेतातच विष प्राषन केले. त्यानंतर त्याला तातडीने नेर शासकीय रुग्नालयात हलविण्यात आले. तेथून यवतमाळ येथे वंसतराव नाईक शासकीय रूग्नालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. ठाणेदार अनिल किनगे, जमादार राजेश चौधरी, प्रदीप खडके हे परीस्थीवर नियंत्रन ठेऊन आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने मांगलादेवी परिसरात विद्युत मंडळ व अग्निशामक दल यांच्याबद्दल रोष व्यक्त होत आहे.