मधुकर खोडे महाराज : किसान गणेश मंडळाद्वारे बळीराजा चेतना अभियानाद्वारा कीर्तनउमरखेड : शेतकऱ्याच्या मुलाने दररोज आपला बाप शेतात राब राब राबून सायंकाळी घरी परतल्यावर त्याच्या चेहऱ्याचा अभ्यास करावा. चिंताग्रस्त, तणावग्रस्त भाव ओळखून संवाद साधावा. तणावाचे कारण ओळखून धीर द्यावा. यातून आत्महत्येसारख्या घातक विचारातून शेतकऱ्यांचे मत परिवर्तन होईल, असे प्रतिपादन व्यसनमुक्ती सम्राट मधुकर महाराज खोडे यांनी येथे केले.येथील शिवाजी वॉर्डातील किसान गणेश मंडळाद्वारे आयोजित बळीराजा चेतना अभियानांतर्गत आयोजित कीर्तनात ते बोलत होते. शेतातील सोयाबीनने माना टाकल्या. कापूस वाळायला लागला, तरी घरातील माणसांनी एकजुटीने व धीराने शेतकऱ्यांचे मनोबल वाढेल, निसर्गाच्या लहरीपणात शेतकऱ्यांना घरातील सदस्यांकडून खंबीर साथ मिळणे गरजेचे आहे. शेतीचे गणित तोट्यात असल्यामुळे इतर जोडधंद्यांची साथ द्या, व्यसनांपासून दूर राहा, असे आवाहन मधुकर महाराज खोडे यांनी केले. माणसाने दारू, मटका, गुटखा, चहा, बीडी, सिगरेट आदी व्यसनांचा त्याग केल्यास कुटुंबाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार असे त्यांनी सांगितले. यावेळी अनेकांनी महाराजांच्या झोळीत व्यसनांचे दान दिले. तसेच व्यसनांच्या आहारी जाणार नाही, अशी शपथ घेतली. कीर्तनाला बिटरगाव येथील भजनी मंडळाने साथसंगत केली. कार्यक्रमाला माजी आमदार विजय खडसे, वसंत साखर कारखान्याचे संचालक आनंदराव चिकणे, यवतमाळ अर्बनचे संचालक सुदर्शन कदम, नितीन माहेश्वरी, आदेश जैन, विलास देवसरकर आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी किसान गणेश मंडळ व महात्मा बसवेश्वर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
शेतकरी पुत्राने द्यावा आपल्या वडिलांना धीर
By admin | Published: September 15, 2016 1:24 AM