यवतमाळ : खरिपाचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरीसुद्धा पैशाअभावी शेतकरी या हंगामाला सामोरो जाण्यास तयार नाही. आधीच्या कर्जाची परतफेड न झाल्याने बँक पुन्हा कर्ज देण्यास तयार नाही. कारवाईच्या बडग्याने सावकारही शेतकऱ्यांना उभे करण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकरी चांगलाच कचाट्यात सापडला आहे.
निसर्ग प्रकोपाने २०१३-१४ हे संपूर्ण वर्ष शेतकऱ्यांसाठी अतिशय वाईट गेले. आधी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातातून गेला त्यानंतर रबी हंगाम घरात येईल असे वाटत असतानाच गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास पळवून नेला. या परिस्थितीत कंबरडे मोडलेला शेतकरी पुन्हा उभा राहलाच नाही. अशावेळी आता खरीपाचा हंगाम तोंडावर आला परंतु कर्जाची सोय झाली नाही. त्यामुळे पेरणी पूर्वीच निसर्गराजा हतबल झाल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे.
खरीपाचा पेरणीचा हंगाम अठराशे ते एकोणिसशे कोटीच्या घरात जातो. प्रत्यक्षात बँकांनी १०० ते १५० कोटींच्याच कर्जाचे वितरण केले आहे. यावरून शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी लागणाऱ्या व्यवस्थेचा अंदाज येतो. यावर्षी बँकांची परतफेड साशंक अवस्थेत आहे. परतीचा पाऊस आणि रबी काढणीला झालेली गारपीट यामुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे आज अनेक शेतकरी थकबाकीदार आहेत. थकीत शेतकऱ्यांना बँक कर्ज वितरीत करीत नाही. त्यामुळे पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून असा पेच शेतकऱ्यांपुढे आहे. सावकारी कायद्याने अवैध सावकारांनी कर्ज वितरीत करताना आखडता हात घेतला आहे. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पेरणीपूर्वीच शेतकरी हताश झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी प्रयत्नाची पराकाष्टा करतांनाचे चित्र पहायला मिळत आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी सर्व काही पणाला लावले आहे. अनेकांनी होते-नव्हते ते दागिने गहाण ठेवले आहे. काहींनी तर ते चक्क विकले आहेत. अनेकांनी आपली जनावरेसुद्धा विक्रीस काढली आहे. कसेही करून खरीपात पेरणी करून गेल्या वर्षभऱ्यातील भरपाई काही प्रमाणात का होईना, भरून काढायची, असा प्रयत्न शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे. (शहर वार्ताहर)