तुती लागवड : महागाव तालुक्यातील तरूण शेतकरी करू लागले हिंमत महागाव : परंपरागत पिकांमुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असून, आता तरुण शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा आणि पीक पद्धतीचा ध्यास घेतला आहे. महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता रेशीम शेतीला प्राधान्य दिले असून, अनेक शेतांमध्ये तुतीची लागवड होत आहे. महागाव तालुक्यातील शेतकरी तसेही प्रयोगशील आहेत. अनेक शेतकऱ्यांनी विविध प्रयोग केले आहेत. आता या शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा ध्यास घेतला आहे. अंबोडा, वाकान, हिवरा, सवना आदी परिसरात रेशीम शेती सुरू झाली आहे. अंबोडा येथील मनीष हिंगाडे, सुरेश पतंगे, रोहिदास तायडे, गजानन दातकर, रवी पतंगराव, लक्ष्मण हातमोडे, सवना येथील माणिक खोडे यांनी रेशीम शेतीचा प्रयोग सुरू केले आहे. हिंगाडे यांना रेशीम शेतीचा अनुभव असून, त्यांच्या मार्गदर्शनात रेशीम कोस तयार करण्याचे प्लान्ट तयार करण्यात आले आहे. तुतीच्या पानावर जगणाऱ्या रेशीम अळीपासून कोष तयार होतात. सदर कोष बंगलोरच्या बाजारपेठेत विकले जातात. सध्या सहाशे रुपये किलो कोषाला भाव मिळत आहे. कमी खार्चात जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून शेतकरी रेशीमला पसंती देत आहेत. महागाव तालुक्यात साधारण ५० एकरात तुतीची लागवड झाली असून, अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहे. (शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचा कल वाढला रेशीम शेतीकडे
By admin | Published: April 21, 2017 2:22 AM