शेतकऱ्यांना अनेकदा मजूर मिळत नाहीत. अनेकदा वहितीसाठी ट्रॅक्टर मिळत नाही. या ना त्या कारणाने शेतकरी अडचणीत आले आहे. आता शेतातील धान्य ठेवण्यासाठी बारदानाही मिळत नसल्यामुळे त्यांना अव्वाच्या सव्वा भावात बारदाना विकत घ्यावा लागत आहे. इथेही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
शेतातील गहू, हरभरा, हळद आदी पिके काढून तयार आहे. मात्र, धान्याची साठवणूक करण्यासाठी लागणारा बारदाना परिसरात मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. सर्व वाहतूक लॉकडाऊनमुळे ठप्प असल्याने जिल्ह्याच्या सीमा पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे बाहेरून येणारा बारदाना गावात पोहोचू शकत नाही. आपला मालही विक्रीसाठी नेता येत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे. शेतातील उत्पादित धान्यही साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांपुढे कोणताच मार्ग दिसत नसल्यामुळे शेतकरी मिळेल त्या किमतीत बारदाना विकत घेण्यास तयार आहे.
बॉक्स
व्यापाऱ्यांकडून किमतीत वाढ
ज्या व्यापाऱ्यांकडे बारदाना शिल्लक आहे, तो एरव्ही दोन ते दोन हजार २०० रुपये प्रति शेकडा दराने विकला जात होता. आता तोच बारदाना तीन ते तीन हजार ५०० रुपये प्रति शेकडा दराने विकला जात आहे. व्यापाऱ्यांनी दर वाढविल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. विशेष म्हणजे व्यापारी आपल्याकडून बारदाना नेल्यास शेतमाल आपल्यालाच विक्री करावा, अशी अट घालत आहे. त्यामुळे नवीन संकट उभे ठाकले आहे.