१ आॅगस्टपासून हल्लाबोल : कर्जमाफीसह हेक्टरी अनुदानाची मागणीयवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी विधवांनी विदर्भ जनआंदोलन समितीच्या पुढाकारात उपोषण सत्याग्रह केला. या सत्याग्रहामध्ये शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान, संपूर्ण कर्जमाफी, पीक विम्याची मदत, आदिवासींना खावटी कर्जाची मदत तसेच थकीत वीज बिल माफ करून भारनियमन बंद करण्याचा ठराव घेण्यात आला. हा ठराव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यावर निर्णय न झाल्यास १ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करणार असल्याची माहिती विजसचे नेते किशोर तिवारी यांनी दिली. सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले आहे. राज्य सरकारने बियाणे, खत व इतर कुठलीही मदत शेतकऱ्यांना दिली नाही. गारपीटीची मदत, पीक विम्याची मदत यापासून शेतकरी वंचित आहे. बँकांकडून पीककर्ज दिले जात नाही. मोदी सरकारने कापसाचा हमी भाव वाढविण्याच्या प्रमुख मागणीलाच बगल दिली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा नैराश्यात गेला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनी भाजप, शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा दिला होता. त्यानंतरही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. उपोषण सत्याग्रहात किशोर तिवारी, मोहन जाधव, माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी, सुरेश बोलेनवार, अंकित नैताम, मोरेश्वर वातीले, तुकाराम मोहुर्ले, युसुफ खाँ पठाण, भीमराव नैताम, प्रेम चव्हाण, नितीन कांबळे, नंदू जयस्वाल, संतोष नैताम, सुनील राऊत आदींसह किरण कोलवते, अपर्णा मालीकर, रेखा गुरनुले, भारती पवार, शीला मांडवगडे, उमा जिड्डेवार, ज्योती जिड्डेवार आदी सहभागी झाले होते. (कार्यालय प्रतिनिधी)
पांढरकवडा येथे शेतकरी विधवांचा उपोषण सत्याग्रह
By admin | Published: July 12, 2014 11:55 PM