अशोकराव चव्हाण : सर्वपक्षीय ‘शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रा’ वणीत पोहोचली वणी : शेतमालाला अत्यल्प भाव, त्या नैराश्येतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून जोवर शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे दिला. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बुधवारी दुपारी सर्वपक्षीय शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेचे वणीत आगमन झाले. त्यानंतर स्थानिक शेतकरी मंदिरात एक सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजवादी पार्टीचे अबु आजमी, माजी मंत्री पतंगराव कदम, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनील केदार, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळ, अमर काळे, यशोमती ठाकूर, गोपालदास अग्रवाल, अमित झनक यांच्यासह विरोध पक्षातील सुमारे ५० आमदार उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, भाजपाचे सरकार हे महाराष्ट्राच्या मुळावर उठले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला लोकशाही पद्धतीने वाचा फोडू पाहणाऱ्या १९ आमदारांना निलंबित करण्यात आले. आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला, मात्र भाजपा सरकार त्यासाठी चालढकल करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. याविरूद्ध आता समाजाने पेटून उठले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते एका वाहनात बसून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र आले. भाजपाचे सरकार उन्मत्त झाले आहे, या सरकारला जनतेची व लोकाशहिची गरज उरली नाही, राज्यात आठ हजार ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र भाजपा सरकारला त्याचे कोणतेही सोयरसुतक नाही, असा आरोप चव्हाण यांनी केला. यावेळी जोगेंद्र कवाडे यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाषणातून चर्चा केली. प्रास्ताविक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार वामनराव कासावार यांनी केले. संचालन राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले, तर आभार अॅड.देविदास काळे यांनी मानले. (कार्यालय प्रतिनिधी)
शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
By admin | Published: March 30, 2017 12:12 AM