किशोर तिवारी : शेतकरी आयोगांच्या अध्यक्षांची बैठकलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेती आणि शेतकऱ्यांचा श्वाश्वत विकास व्हावा यासाठी बळकट कृषी धोरण आवश्यक असल्याची महत्वपूर्ण सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज केली.नीती आयोगामध्ये दिल्ली येथे विविध राज्यातील शेतकरी आयोगांच्या अध्यक्षांची बैठक बोलविण्यात आली होती. नीती आयोगाच्या कृषी विभागाचे सदस्य प्रो. रमेश चंद यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. यावेळी विविध राज्यांचे शेतकरी आयोगाचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी तिवारी म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांसाठी मजबूत अशा कृषी धोरणाची आवश्यकता आहे. या धोरणात शेतकऱ्यांचा संपूर्ण विकास अपेक्षित आहे. याबाबत त्यांनी यावेळी काही सूचना मांडल्या, यामध्ये शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात तसेच योग्य वेळी पतपुरवठा होणे गरजेचे आहे. हा पतपुरवठा गरीबातील गरीब शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. यासह शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज हे चार टक्के दराने असावे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांवरील कर्ज फेडीची मर्यादा वाढवून मिळावी, कृषी जोखीम निधीची स्थापन व्हावी ज्यातून आपतकालीन परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून दयावा, शेतकरी महिलांना किसान क्रेडीट कार्ड वितरीत करावे, शेतकऱ्यांसाठी तसेच शेतीत उपयोगी असणाऱ्या पशुंसाठी एकत्रीत एकात्मिक क्रेडिट-पीक पशुधन आरोग्य विमा योजना असावी, सर्व पीकांसाठी वीमा आवश्यक असून तो कमी दराचा असावा यासह ग्रामीण वीमा विकास निधी असावा, ज्यामाध्यमातून गावातील विकास कामांचा देखील विमा उतरविला जाऊ शकतो, आदी सूचना किशोर तिवारी यांनी केल्या. त्यांच्या या सूचना नीती आयोगाने नोंदवून घेतल्या असून या सूचनांचे काटेकोरपणे पालन झाल्यास शेतकऱ्यांना समृद्धी येईल.राज्याने नुकतेच शेतकऱ्यांचे कर्जमाफ केलेले आहे. केंद्र शासनाने ४० हजार कोटींची आर्थिक मदत करावी अशी मागणी, स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यावेळी केली.
शेतीचे बळकट धोरण आवश्यक
By admin | Published: July 10, 2017 1:02 AM