लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : गावातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राळेगाव तालुक्यातील आष्टोना येथील नागरिकांनी मुंडण करून येथील जिल्हा कचेरीसमोर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला. आष्टोना येथील मंजूर गावठाणातील दोन एकर जागेचे प्लॉट वितरित करावे, स्मशानभूमीचा सातबारा ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावा, आष्टोना ते खैरी आणि कोथुर्ला या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशा मागण्या या नागरिकांनी केल्या आहे. राळेगाव येथे वारंवार निवेदने देऊनही उपयोग झाला नाही. अखेर गावकऱ्यांनी जिल्हा कचेरीसमोर उपोषणाला प्रारंभ केला. या उपोषणात उपसरपंच नानाजी गोखरे, रामभाऊ गाढवे, नारायण येरगुडे, पुंडलिकराव धवस, विठ्ठल उपाध्ये, महादेव राजुरकर, प्रमोद राजुरकर, सुनील येरगुडे आदी सहभागी झाले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या उपोषणकर्त्यांनी मुंडन केले आहे. तीन दिवसांपासून प्रशासनाने मात्र दखल घेतली नाही.
आष्टोणाच्या नागरिकांचे मुंडण करून उपोषण
By admin | Published: May 08, 2017 12:19 AM