यवतमाळ :लग्न म्हणजे आनंदाचा क्षण. वर आणि वधूकडील मंडळी त्यासाठी कित्येक महिने परिश्रम घेऊन आनंदमयी क्षणांची प्रतीक्षा करीत असतात. वर आणि वधूचे वडील तो क्षण डोळ्यात साठवून ठेवण्याची आस धरतात. मात्र येथे आक्रीत घडले. मुलगा बोहल्यावर चढण्यापूर्वीच वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे आनंदाचा सोहळा दु:खात परिवर्तीत झाला.
वैभव महादेवराव चिरडे या वराचे रविवारी येथीलच दक्षणेश्वर मंदिरात शुभमंगल ठरले होते. वधूसुध्दा गावातीलच दिवंगत प्रकाश कसंबे यांची कन्या होती. या लग्नासाठी नियोजित वेळेपर्यंत वऱ्हाडी मंडळी मंदिरात दाखल होत होती. दोन्ही परिवारातील आप्त, नातेवाईक मंडळी मोठ्या आनंदाने शुभमंगलाची प्रतीक्षा करीत होते.
विवाहापूर्वी मोठ्या आनंदाने नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. मात्र, अचानक नवरदेवाच्या पित्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे एका क्षणात सर्व चित्रच पालटून गेले. वरपित्याला तातडीने यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने सर्वच स्तब्ध झाले. आनंदाचा सोहळा दु:खात परिवर्तीत झाला. गावामध्ये स्मशानशांतता पसरली.
महादेव मामाच्या जाण्याने हळहळ
वरपिता महादेवराव चिरडे गावात ‘महादेव मामा’ म्हणून परिचित हाेते. ते सर्वांना प्रिय व्यक्तिमत्त्व होते. ते कुणाच्याही सुख, दु:खात सहभागी व्हायचे. त्यांच्या मृत्यूमुळे लग्नसोहळ्यासाठी आलेली मंडळी दु:खात बुडाली. संपूर्ण गावावर शोककळा पसरली. जड अंत:करणाने त्यांच्या पार्थिवावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी असा आप्त परिवार आहे.