प्रकाश लामणे -पुसद(यवतमाळ) - उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. वेळेवर व्हेंटीलेटर न मिळाल्याने भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ही वार्ता कळताच कर्नाटाकतील हुबळी येथे असलेला त्यांचा मुलगा निरज याला रात्रभर दुचाकीने प्रवास करून ७०० किलोमीटर अंतर कापून पुसद गाठावे लागले. या गरीब कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून त्यांच्या मदतीसाठी पुसदकर सरसावले आहेत.
प्रेमसिंग गोपू राठोड (४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मूळचे कर्नाटक येथील प्रेमसिंग हे कामानिमित्त येथील श्रीरामपूर भागात स्थायिक झाले. भाजीपाला व फळ विक्री करून ते उदरनिर्वाह करीत होते. पत्नी निर्मला गृहिणी असून मुलगी निर्जला दहावी उत्तीर्ण झाली आहे. तर मुलगा निरज कर्नाटकातील हुबळी येथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. तो ऑल इंडिया रँकींगमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. परंतु सर्वकाही सुरळीत असताना प्रेमसिंग यांना दवाखान्यात भरती करावे लागले. मात्र अखेर त्यांना व्हेंटीलेटर न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
यावेळी निरजला बाबांची प्रकृती अत्यवस्थ आहे, असा निरोप मिळाला होता. त्यामुळे तो दुचाकीने पुसदकडे निघाला. रात्रभर ७०० किलोमीटर अंतर कापून पुसदमध्ये पोहोचला. मात्र, बाबांशी दोन शब्द बोलण्याची इच्छा अर्धवट राहिली. घरातील चित्र पाहून त्याने हंबरडा फोडला. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने राठोड परिवार उघड्यावर आला आहे. मुलांच्या पुढील शिक्षणासाठी समाजातील ज्येष्ठ मंडळींकडून आर्थिक मदतीसाठी आवाहन करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत कृषी अधिकारी के.एस. राठोड, शिवलिंग डुबुकवाड, संतोष जाधव, सुनील ठाकरे, के.डी. राठोड, जयसिंग राठोड, प्रा.विजय राठोड, लहू पवार, ताई सारंगे, डाॅ.मनीष कनवाळे, आदींनी २२ हजार रुपयांची लगेच मदत केली. मात्र, समाजबांधवांनी आणखी भरीव मदत करण्याची गरज आहे.
डॉक्टर होण्याचे स्वप्न सापडले संकटातमृत प्रेमसिंग राठोड यांचा मुलगा निरज हा एमबीबीएसच्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. भाजीपाला विक्री करून प्रेमसिंग यांनी मुलाला डाॅक्टर बनविण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र आता वडील गेल्याने हे स्वप्न संकटात सापडले आहे. त्यामुळे राठोड कुटुंबीयांना समाजबांधवांकडून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.