अर्जुनाची घटना : पैशाच्या वादातून घातले होते कुऱ्हाडीने घाव यवतमाळ : पैशाच्या जुन्या वादातून पिता-पुत्राने एकावर कुऱ्हाडीने घाव घातले. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांनाही चार वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. शंकर बाजीराव सहारे, नवनाथ शंकर सहारे रा. अर्जुना, असे शिक्षा झालेल्या पिता-पुुत्राचे नाव आहे. त्यांनी २६ नोव्हेंबर २००९ रोजी सायंकाळी ७ वाजता श्रावण गिरडकर याला अर्जुना येथे रस्त्यात अडवून त्यांच्यासोबत जुन्या पैशावरून वाद घातला होता. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यात शंकरने कुऱ्हाडीने, तर नवनाथने चाकूने हल्ला केला. यात श्रावण गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी श्रावणची पत्नी वंदना गिरडकार यांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपींविरूद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. तपास अधिकारी रामकृष्ण नंदपटेल यांनी दोषारोप पत्र तयार करून न्यायालयात सादर केले. न्यायाधीश ए.एस.वाघमारे यांनी या खटल्यात एकूण आठ साक्षीदार तपासले. त्यात जखमी श्रावण आणि डॉक्टरांची साक्ष ग्राह्य मानून आरोपी पिता-पुत्राला चार महिने कारावास, प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात सरकारी वकील निती दवे यांनी युक्तीवाद केला. (कार्यालय प्रतिनिधी)
पिता-पुत्राला चार वर्षे कारावास
By admin | Published: February 22, 2017 1:17 AM