- संजय भगत
यवतमाळ : महागाव तालुक्यातल्या काळी (दौलतखान) इथे दीड महिन्यांपूर्वी झालेल्या तरुणीच्या संशयास्पद खून आणि बलात्कार प्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी पीडीत मुलीच्या कुटुंबीयांनी केलीय. या प्रकरणात स्थनिक पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही कुटुंबियानी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.
काळी इथल्या एका आश्रमशाळेत पीडीत मुलगी 12 वीत शिकत होती. 15 ऑक्टोबरला ती घराबाहेर गेली होती. त्यानंतर ती परतलीच नाही. तीच्या कुटुंबीयांनी 17 ऑक्टोंबरला ती हरवली असल्याची तक्रार पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल केली. नंतर तीन दिवसांनी 18 तारखेला पीडीत मुलीचा मृतदेह हा नारायण चवरे यांच्या शेतातल्या विहिरीत आढळून आला.
पीडीत मुलीच्या नातेवाईकांनी हा प्रकार संशयास्पद असल्याची शंका व्यक्त केली आणि मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केलाय. आणि त्यानुसार गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवायला तब्बल दहा दिवस घेतले आणि कलम 306 नुसार आत्महत्या आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा साधा गुन्हा नोंदवला.
या प्रकरणी पोलिसांनी संतोष बनसोडे आणि विष्णू राजगुरु या तरुणांना अटक केली. मुख्य आरोपी राहुल खंदारे हा अजुनही फरार आहे. पोलिसांनी साधी कलमं लावल्याने या दोनही आरोपाचा जामीनही झालाय. त्यामुळं पीडीत मुलीला न्याय कसा मिळणार असा सवाल तीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये न्याय मळत नसल्यानं पीडीत मुलीच्या भावाने यवतमाळचे पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे घटनेची तक्रार केली असून या प्रकरणी सामुहिक बलात्कार आणि खूनाच्या गुन्ह्याची नोंद करावी अशी मागणी केलीय. या प्रकरणात पुसद ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेबद्दल प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसच जर आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असतील तर नागरिकांनी जायचं कुठं असा सवाल पीडीत मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.