यवतमाळ : दहावीत आदिलाबादपासून दहा किलोमीटर अंतरावर परीक्षा केंद्र मिळाल्याने दडपण आले होते. इंग्रजीचे शिक्षक मुरलीधर राव यांनी त्यावेळी धीर देत तुला ‘कीर्ती’ या नावाप्रमाणेच स्वत:ला सिद्ध करायचे आहे. घाबरुन कसे चालेल? अशा शब्दात आत्मविश्वास वाढविला. तेव्हापासून जीवनात कधीच मागे फिरुन बघितले नाही. आईचे उच्च शिक्षणाचे स्वप्न माझ्या माध्यमातून तिने पूर्ण केले. आदिलाबादचे हिंदी हायस्कूल, त्यानंतर महिला महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर नांदेड येथून एलएलबी व एलएलएमची पदवी पूर्ण केली. विद्यार्थीदशेत नेहमीच ‘टॉपर’ असलेल्या जिल्हा कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी सांगत होत्या...दहावीच्या परीक्षा काळात दिलेला आत्मविश्वास....पदवीपर्यंतच्या शिक्षणात आई व महाविद्यालयीन शिक्षकांचे मार्गदर्शन मिळत गेले. पदवी पूर्ण करताच लग्न झाले. संसारात गुंतून पडले. मात्र पती राजेश चिंतामणी यांनी माझ्या शिक्षणाची इच्छा पूर्ण केली. तसेच वेळोवेळी मला त्यांनी प्रोत्साहित केले. महागावसारख्या गावात राहून नांदेड येथून एलएलबी व एलएलएम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केले. तेथेही अभ्यासाची चुणूक दाखविल्याने टॉपर राहता आले. आई, गुरुजन व पती या सर्वांनी केलेले मार्गदर्शन माझ्या आजवरच्या वाटचालीत अत्यंत बहुमोल ठरणारे आहे. त्यांच्याविषयी आदर आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने या सर्वांना वंदन.आईच्या धडपडीमुळे आज यशाच्या शिखरावर..आई-वडील दोघेही राधाबाई बुधगावकर यांच्या कलामंचात नाट्य कलावंत होते. त्यांचा प्रयोगाच्या निमित्ताने सारखा प्रवास सुरू असायचा. त्यामुळे शिक्षणासाठी मामाकडे आदिलाबाद येथे ठेवले होते. आई सुमती हिला डॉक्टर व्हायचे होते. मात्र एका अपघातामुळे बारावीपर्यंतच तिचे शिक्षण झाले. तिने आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी मला प्रोत्साहित केले. शाळेत दाखल होण्यापूर्वीच मला अक्षर ओळख झाली होती. दहावीतील शिक्षक सुधाकर राव, तारा शहा मॅडम यांचे मार्गदर्शन मिळत गेले. नावाप्रमाणे कीर्ती मिळविण्यासाठी सतत अभ्यास सुरू होता. त्यामुळेच बीए फायनलमध्ये १९९५ ला आदिलाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी हा बहुमान मिळाला. त्यावेळी आई-वडिलांसह झालेला सत्कार आजही स्मरणात आहे. मला नेहमीच गणिताची भीती वाटत होती. त्यामुळे जास्त सराव होत होता. शालेय जीवनात याच विषयात सर्वाधिक गुणही घेतले आहे. पुढे गणिताच्या भीतीनेच कला शाखा निवडून पदवी पूर्ण केली.सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातही प्रावीण्य...नेहमीच टॉपर असल्याने शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षकांचा लोभ मिळत गेला. शिवाय शाळा-महाविद्यालयात झालेल्या सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमात, क्रीडा प्रकारात सहभाग असायचा. अभ्यासाबरोबरच अवांतर उपक्रमात तितक्याच हिरीरीने सहभागी होत असल्याने शिक्षकांकडूनही सतत प्रोत्साहन मिळत गेले. याचा परिणाम माझ्या व्यक्तिमत्व विकासात झाला.
शाळा-महाविद्यालयात शिक्षकांची आवडती विद्यार्थिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 6:00 AM
महागावसारख्या गावात राहून नांदेड येथून एलएलबी व एलएलएम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केले. तेथेही अभ्यासाची चुणूक दाखविल्याने टॉपर राहता आले. आई, गुरुजन व पती या सर्वांनी केलेले मार्गदर्शन माझ्या आजवरच्या वाटचालीत अत्यंत बहुमोल ठरणारे आहे.
ठळक मुद्देगृहिणी ते जिल्हा कारागृह अधीक्षक पदाच्या प्रवासात आई, पती व विद्यालयीन शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले