पुसद : रोटरी क्लबच्यावतीने श्रीराम आसेगावकर शिक्षण संकुलात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी कृषी भूषण दीपक आसेगावकर होते. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार प्रा.न.मा. जोशी व पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद उपस्थित होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.उत्तम खांबाळकर हेसुद्धा आवर्जून उपस्थित होते. सेवानिवृत्त शिक्षिका व राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या संचालिका सुनीता केळकर आणि राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक यशवंत देशमुख यांचा शाल, श्रीफळ व गौरवपत्र देवून सत्कार करण्यात आला. दोन्ही सत्कारमूर्तींनी सध्याच्या परिस्थितीत पालकांनी चौकस राहण्याचे आवाहन केले. पाल्यांना संस्कृती, नीतीमूल्य, शिष्टाचार, देशाभिमान याचे धडे द्यावे, तसेच शिक्षकांनी बदलत्या परिस्थितीशी समायोजन साधून विद्यार्थ्यांना गतिशील व उपक्रमशील बनविले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. न.मा. जोशी यांनी पालकांनी पाठांतराकडे लक्ष न देता कौशल्यपूर्ण शिक्षण द्यावे, चंगळवादी संस्कृतीपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक आसेगावकर यांनी आजच्या शिक्षण क्षेत्रातील धोरणाबद्दल खंत व्यक्त केली. शरद मैंद यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला रोटरी क्लबचे प्रा.अजय गडम, श्रीराम पद्मावार, सचिन शैलेश उबाळे, अॅड.अशोक महामुने, गजेंद्र निकम, अॅड.विवेक देशमुख, डॉ.भानुप्रकाश कदम, अंजूम कपाडिया उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
ज्येष्ठ आदर्श शिक्षकांचा सत्कार
By admin | Published: September 21, 2015 2:28 AM