फोटो
उमरखेड : सण व उत्सव हे सामाजिक कार्यातून प्रबोधन करण्यासाठी आहे. त्यासाठीच या उत्सवांची निर्मिती झाल्याचे मत पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी व्यक्त केले.
येथील पोलीस ठाण्यातर्फे स्थानिक जिजाऊ भवनात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते. मंचावर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन, तहसीलदार आनंद देऊळगावकर उपस्थित होते. यावेळी डॉ.भुजबळ यांनी उमरखेडच्या संवेदनशीलतेच्या मुद्द्याला हात घालून नैसर्गिक भावनेच्या घटनेला जर कोणी जातीय रंग देण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कोरोनाचा धोका कायम असून, डेल्टाच्या रूपाने तो कार्यरत आहे. आता नागरिकांनी जास्त काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
सण, उत्सवावर बंदी, मात्र राजकीय कार्यक्रमांवर कोणताही अंकुश नसल्याच्या प्रश्नावर त्यांनी राजकीय व सामाजिक स्तरावर होणारी गर्दी टाळण्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. बैठकीत नितीन भुतडा यांनी सामाजिक शांती बिघडू न देण्याचे अभिवचन, यावेळी प्रशासनाला दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन, तहसीलदार देऊळगावकर,प्रा.डॉ.अनिल काळबांडे, बाळासाहेब ओझलवार यांनीही समयोचित भाषणे केली.
प्रास्ताविक ठाणेदार आनंद वागतकर, सूत्रसंचालन प्रवीण सूर्यवंशी, तर आभार पोफळीचे ठाणेदार कैलास भगत यांनी मानले.