लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ अशी म्हण मानवी जीवनात प्रचलित आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात आईचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग तो प्राणी असो वा मानव. आई-मुलाचं नातं हे तेवढेच घट्ट आणि दृढ असते. असाच प्रसंग मुकिंदपूर गावात अनुभवायला मिळाला.
पाण्याच्या शोधात वासरू विहिरीत पडले. जिवाच्या आकांताने ते हंबरू लागले. हा आवाज त्याची माय गायीच्या कानावर गेला. तीसुद्धा विहिरीच्या दिशेने धावली अन् लेकराला वाचविण्यासाठी तिने विहिरीत उडी घेतली. लोकांनी केलेल्या प्रयत्नाने दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. आईच्या ममतेचा परिचय देणारा हा प्रसंग अकोला मुकिंदपूर गावात शनिवारी घडला.
उन्हाचा पारा वाढला आहे. जनावरांचाही जीव पाण्यासाठी कासावीस होत आहे. पाण्याचे दोन घोट मिळावे यासाठी धडपडताना मुकिंदपूर शिवारातील शेतात असलेल्या मोठ्या विहिरीत एक वासरू पडले. या विहिरीत दोन अडीच फूट पाणी आहे. हा प्रकार कुणाच्या लक्षात येण्यापूर्वीच गाय वासराच्या आवाजाच्या दिशेने धावली. लेकराचा जीव वाचविण्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नात तीही विहिरीत पडली.
हा प्रकार या रस्त्याने जाणारे संजय राऊत यांना दिसला. त्यांनी गुराख्याला माहिती दिली. त्याने मदतीसाठी धावा केला. गावातून लोक मदतीला पोहोचले. गाय-वासराला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. या जिवांना बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले. तोपर्यंत या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दोराच्या साहाय्याने गाय-वासराला बाहेर काढण्यात आले.