काशीनाथ लाहोरे यवतमाळ जिला आपण प्रमाण भाषा म्हणतो, ती काही लोकांनी प्रतिष्ठेची भाषा केली आहे. त्यामुळेच बोली भाषा मागे पडत आहे. परंतु प्रमाण भाषेपेक्षाही बोलीभाषा जुनी आहे. आपले विचार-भावना व्यक्त करण्यासाठी बोलीचा अधिकाधिक वापर करण्याची आवश्यकता आहे. बोली भाषेतील विशिष्ट लकबीमुळेच माझी स्वत:ची स्वतंत्र ओळख अभिनय क्षेत्रात निर्माण झाली, चित्रपटातील बोली भाषा हृदयाला थेट भिडते, असे मराठी चित्रसृष्टीतील आघाडीचे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यवतमाळात एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी ‘लोकमत’शी दिलखुलास गप्पा मारल्या. आपल्या विशिष्ट लकबीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत ठसा उमटविणाऱ्या मकरंद अनासपुरे यांनी हिंदी व मराठी चित्रपटात आपल्या अभिनय शैलीचा ठसा उमटविला आहे. कायद्याचे बोला, सरकारनामा, सासू नंबरी-जावई दस नंबरी, दे धक्का, गाढवांच लग्न आदी चित्रपटात त्याने आपल्या भाषेची छाप सोडली आहे. सध्या कॉमेडीच बुलेट ट्रेन या शोमध्ये मकरंद परीक्षक म्हणून आहे. तेथे वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दाबाबत विचारले असता तो म्हणाला, जेथे ज्याची गरज आहे तशी भाषा वापरावी लागते. आपण प्रत्येक वेळा मराठीचा आग्रह धरता कामा नये, नाही तर तो आगावूपणा वाटतो. या मालिकेत काही मर्यादे बाहेरचे शब्द आढळल्यास मी तसे स्पष्ट सांगतो. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ हा मकरंद अनासपुरेचा सर्वात आवडता चित्रपट आहे. नाना पाटेकर, ओमपुरी, नसरुद्दीन शाह हे अभिनय क्षेत्रातील आदर्श तर नायिका म्हणून सर्वाधिक पसंती स्मीता पाटील यांना असल्याचे सांगितले. यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. तर सज्ञान होऊन म्हणजेच कला क्षेत्रात पक्के पाय रोवून आपण आलो पाहिजे, असे तो म्हणाला.
बोली भाषेमुळे चित्रपट हृदयाला भिडतो
By admin | Published: March 01, 2015 2:03 AM