यवतमाळ: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय शिक्षक पदोन्नतीचा प्रश्न अखेर निकाली निघणार आहे. विषय शिक्षक पदोन्नतीकरिता प्रशासनाने बुधवारी जिल्ह्यातील शिक्षकांना सकाळी ८ वाजता समुपदेशनासाठी पाचारण केले आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांनी मंगळवारी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी आदेश निर्गमित केले आहेत. इयत्ता सहावी ते आठवी या वर्गांना शिकविण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार विषय शिक्षक देणे बंधनकारक आहे. परंतु, जिल्ह्यात अनेक दिवसांपासून विषय शिक्षकांची पदे रिक्त आहेत. प्राथमिक शिक्षकांमधून पदोन्नतीने ही पदे भरण्याची मागणी होती. त्याकरिता वारंवार निवेदने, आंदोलनेही झाली. परंतु, ही प्रक्रिया रखडलेली होती.
मात्र आता जिल्हा परिषद प्रशासनाने या पदोन्नती प्रक्रियेसाठी जानेवारीतच सेवाज्येष्ठता यादी जाहीर केली होती. त्यानुसार, प्राथमिकच्या वर्गावर म्हणजेच इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिकविणाऱ्या मराठी आणि उर्दू माध्यमाच्या ४९३ शिक्षकांना विषय शिक्षक म्हणून सहावी ते आठवीच्या वर्गावर जाण्याची संधी मिळणार आहे. या पदोन्नतीकरिता बुधवारी समुपदेशन प्रक्रिया केली जाणार आहे. त्याकरिता नवनियुक्त शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांनी सोळाही गटशिक्षणाधिकाऱ्यांना मंगळवारी पत्र पाठवून संबंधित शिक्षकांना समुपदेशनासाठी उपस्थित ठेवण्यासाठी कळविले आहे. ही समुपदेशन प्रक्रिया जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या दालनात सकाळी ८ वाजतापासून सुरू केली जाणार आहे.
का अडली होती पदोन्नती प्रक्रियासहावी ते आठवीच्या वर्गावर विषय शिक्षक नेमणे बंधनकारक असले तरी आरटीईनुसार, अशा शिक्षकांकडे संबंधित विषयाची पदवी असणे गरजेचे आहे. परंतु, मध्यंतरी ही पदे भरण्यासाठी शासनाने संबंधित विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना संधी दिली होती. मात्र नेमणुकीनंतर पदवी मिळविण्याचे बंधन घालण्यात आले होते. काही शिक्षकांनी अशी पदवी न मिळविल्याने त्यांना पुन्हा पदावनत करण्याचेही आदेश आले होते. त्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला होता. त्यानंतर विषय शिक्षक पदोन्नतीसाठी संबंधित शिक्षकाकडे टीईटी उत्तीर्णचे प्रमाणपत्र असावे अशीही अट पुढे आली होती. त्यावर शिक्षकांनी आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने थेट शिक्षक संचालकांची भेट घेऊन नाहरकत प्रमाणपत्र आणले. त्यामुळे आता पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘पवित्र’द्वारे निवडलेल्या उमेदवारांनाही नियुक्ती मिळणारदरम्यान, कार्यरत शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया सकाळी पार पडल्यानंतर दुपारच्या सत्रात पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या उमेदवारांचीही पदस्थापना प्रक्रिया केली जाणार आहे. गेल्या तीन दिवसात या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. यातून मराठी माध्यमाचे २६९ आणि उर्दू माध्यमाचे १३ शिक्षक मिळणार आहेत. बुधवारी दुपारी २ वाजता सीईओंकडे या २८२ उमेदवारांचे समुपदेशन करून त्यांना पदस्थापना दिली जाणार आहे. या उमेदवारांना कोणती पंचायत समिती मिळणार, तेथील कोणते गाव दिले जाणार याबाबत उत्सुकता आहे.
विषय शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी ४९३ शिक्षकांना बुधवारी समुपदेशनासाठी बोलावण्यात आले आहे. तसेच पवित्र पोर्टलव्दारे निवड झालेल्या उमदेवारांनाही बुधवारीच समुपदेशनानंतर पदस्थापना दिली जाणार आहे.- प्रकाश मिश्रा, प्राथमिक शिक्षणाधिकारी, यवतमाळ