लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सुमारे नऊ महिन्यांपासून रखडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी अखेर पुण्याच्या सहकारी निवडणूक प्राधिकरणाला मुहूर्त सापडला आहे. १२ डिसेंबरला मतदान घेतले जाणार असून त्याची मतमोजणी रविवार १३ डिसेंबरला होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील संचालकांच्या २१ जागांसाठी २६ मार्च २०२० ला मतदान होऊ घातले होते. यातील दोन जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. उर्वरित १९ जागांसाठी मतदान प्रक्रिया ताेंडावर असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने ही निवडणूक लांबणीवर पडली. गेल्या नऊ महिन्यांपासून ही निवडणूक घेतली जावी यासाठी प्रयत्न केले जात आहे.
विधानसभेच्या निवडणुका होत असताना दीड हजार मतदार असलेल्या जिल्हा बॅंकेच्याच निवडणुकीला कोरोना काळात अडचण काय असा मुद्दा उपस्थित केला गेला होता. ही निवडणूक तातडीने घेण्याची मागणी लावून धरली. दरम्यान विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने बॅंक निवडणुकीत याची अडचण निर्माण झाली. ही आचारसंहिता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात बॅंकेची निवडणूक घेतली जाणार आहे. त्यासाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाने शनिवार १२ डिसेंबराचा मुहूर्त साधला आहे. या दिवशी संचालकांच्या १९ जागांसाठी सुमारे दीड हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. याची मतमोजणी १३ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. शुक्रवारी बॅंकेची निवडणूक ४ डिसेंबरला होणार याची जिल्हाभर चर्चा होती. मात्र ती अफवा ठरली.
१२ डिसेंबरला होऊ घातलेले मतदान लक्षात घेता जिल्हा बॅंक निवडणुकीतील दोनही पॅनलने मतदारांशी संपर्क वाढविला आहे. कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष महाविकास आघाडीत निवडणूक लढविणार आहे. तर विरोधात भाजपचे पॅनल आहे. या पॅनलमध्ये काही अनुभवी संचालकांचा समावेश आहे. सध्या बॅंकेवर बहुमत कॉंग्रेस, राष्ट्रवादींच्या संचालकांचे तर अध्यक्षपद भाजपकडे होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून बॅंकेवर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांना प्रशासक नेमले गेले. १२ डिसेंबरच्या निवडणुकीनंतर बॅंकेवर महाविकास आघाडीची सत्ता येणार की भाजप समर्थित पॅनलला मतदारांचा कौल मिळणार याकडे नजरा लागल्या आहेत.