मारेगाव नगरपंचायत : पदाधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण सभेत झाला निर्णय मारेगाव : येथील बहुचर्चित घनकचऱ्याचे कंत्राट शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत रद्द करण्यात आले. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तीन वर्षात तब्बल सव्वा कोटी रूपये खर्च होणाऱ्या या कंत्राटावरून बरेच वादंग निर्माण झाले होते. मारेगाव नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी दीपक इंगोले यांनी नगरपरिषदेच्या हद्दीतील घराघरातील कचरा गोळा करणे, रस्ते झाडणे, नाल्यांची सफाई करणे आदी विविध घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट एका निविदाद्वारे आमंत्रित केले होते. यातील अमरावतीच्या कनक इंटरप्राईजेस नामक संस्थेला प्रती महिना तीन लाख २३ हजार ७८६ या दराने निविदा मंजुर करण्यात आली होती. सदर निविदेबाबत विरोधी गटातील सात नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे कलम ३०८ अन्वये ठराव रद्द करण्याबाबतचे प्रकरणदेखिल न्याप्रविष्ठ केले होते. मात्र सदर कंत्राटाला जिल्हाधिकाऱ्यांकडून वित्तीय व प्रशासकीय मंजुरात डिसेंबर २०१६ ला मिळाली होती. यावरून विरोधी गटातील सात नगरसेवक व शहरातील नागरिकांनी नगरपंचायतीवर मोर्चा काढला होता व तब्बल १४ दिवस साखळी उपोषणसुद्धा केले होते. या प्रकरणात सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैैरीदेखिल झडल्या होत्या. तसेच एकमेकांच्या विरोधात पोलिसापर्यंत देखिल तक्रार झाल्या होत्या. सदर प्रकरणामुळे नगरपंचायतीची विस्तृत चौकशी केली व कंत्राटदाराने दाखल केलेल्या दस्तऐवजांपैैकी काही दस्तऐवज बनावट प्रकारचे असल्याचेही आरोप केले जात होते. अखेर शुक्रवारी झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत बहुचर्चित घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट एका ठरावाद्वारे रद्द करण्यात आले. सदर घनकचरा कामाकरिता नविन निविदा काढण्याचेही ठरविण्यात आले. यामुळे विरोध गटातील नगरसेवक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)
अखेर घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट रद्द
By admin | Published: March 11, 2017 1:04 AM