संतोष कुंडकर
वणी (यवतमाळ) : तालुक्यातील सुकनेगाव जंगलातील एका तलावाकाठी वाघांच्या दोन बछड्यांचा भूकेने व्याकूळ होऊन मृत्यू झाला. या घटनेनंतर बछड्यांपासून दुरावलेल्या वाघिणीच्या सुरक्षेबाबत वनविभाग अस्वस्थ होता. दरम्यान, शुक्रवारी रात्रभर वनाधिकाऱ्यांनी या तलावाकाठी वाघिणीच्या प्रतिक्षेत जागलं केली. याचठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात ही वाघिण ट्रॅप झाल्याने वनाधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.या वाघिणीसोबत असलेला बछडाही सुरक्षित असल्याची माहिती वणीचे आरएफओ प्रभाकर सोनडवले यांनी लोकमतशी बोलताना दिली.
सुकनेगाव जंगलातील महसूल विभागाच्या जागेत असलेल्या तलावाकाठी या वाघिणीच्या एका बछड्याचा मृतदेह बुधवारी आढळून आला होता. त्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी गुरूवारी पुन्हा एक बछडा मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे वन वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. दोनही बछड्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शिकारीच्या शोधात निघून गेलेली आई परत न आल्याने भुकेने व्याकूळ होऊन या बछड्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, ही वाघिण नेमकी कुठे गेली, याचा शोध वन विभागाकडून सुरू होता. शुक्रवारी रात्री कर्मचारी, अधिकाऱ्यांचा मोठा ताफा रात्रभर तलाव परिसरात डेरा टाकून होता. शनिवारी पहाटे ३ वाजून ५४ मिनिटांनी ही वाघिण तलावात पाणी पिऊन परत जात असताना कॅमेऱ्यात ट्रॅप झाली. तिचा बछडाही सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.
वाघिणीची विष्ठा फॉरेन्सिक लॅबमध्ये
तलावात पाणी पिऊन परत जात असताना या वाघिणीने वाटेत विष्ठा केल्याचे आढळून आले. वन विभागाने या विष्ठेचे संकलन करून ती फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविली आहे. दरम्यान, शनिवारी पांढरकवडाचे डीएफओ किरण जगताप, विज्ञान डीएफओ अनंत दिघोडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिसराची पाहणी केली. या वाघिणीच्या हालचालींवर वन विभाग लक्ष ठेऊन आहेत.