शेतकऱ्यांची होतेय लूट : जिल्ह्यात कार्यरत कंपन्यांची होणार सखोल चौकशी यवतमाळ : जिल्ह्यात केळापूरसारख्या मागास भागात कार्यरत असलेल्या मायक्रो फायनान्स कंपन्या आता जिल्ह्यात सर्वत्र दिसू लागल्या आहे. झटपट कर्ज मिळत असल्याने ज्यादा व्याजदर असूनही शेतकरी या कंपन्यांच्या आमिषाला बळी पडत आहे. या फायनान्स कंपनीच्या तगाद्यामुळे आत्महत्या केलेली प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कार्यरत अशा कंपन्यांची माहिती घ्यावी, त्यानंतर त्यांची कार्यकक्षा आणि त्यावरील नियंत्रणाबाबत कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना द्यावयाच्या मदतीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, वसंता राठोड याने मायक्रो फायनान्स कंपनीकडून होत असल्यामुळे छळामुळे आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या कारणांमध्ये आता फायनान्स कंपन्यांचा तगादा हे कारण समोर येत आहे. शासनाच्या पातळीवर राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्जाची सुविधा केलेली असली तरी झटपट कर्ज मिळणे सोयीचे आणि कमी कागदपत्रांवर कर्ज मिळत असल्यामुळे शेतकरी अडचणीच्या वेळी या फायनान्स कंपन्यांना बळी पडत आहे. अत्यंत चढ्या दराने हे व्याजदर उपलब्ध असतानाही शेतकरी कर्ज घेत आहे. जिल्ह्यात या कंपन्यांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे त्यांच्या तक्रारीही वाढत आहेत. हे प्रकार वेळीच रोखण्यासाठी जिल्ह्यात कार्यरत सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांची माहिती घेण्यात येणार आहे. त्यांची एकदा माहिती तयार झाल्यानंतर त्यांची कार्यपद्धती आणि त्यावरील नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्यात येतील. जिल्ह्यातील पवन राठोड या शेतकऱ्याच्या आत्महत्याप्रकरणी चौकशीत त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देण्यात आली होती, त्यामुळे त्याने आत्महत्या केली. मात्र केवळ शेतकरी असल्याने त्याची शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून हे प्रकरण शेतकरी आत्महत्येचे नसून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. साहेबराव पवार याने ज्वारीचे बियाणे शेतात उगविले नसल्यामुळे आत्महत्या केली आहे. या प्रकरणी कृषि विभागाने त्याने कोणत्या कंपनीचे बियाणे पेरले होते, त्या कंपनीची माहिती घ्यावी, त्या बियाणे कंपनीवर कारवाई करावी, अशा सूचना केल्या. त्यामुळे आता मायक्रो फायनान्सच्या अरेरावीला चाप बसणार यात कोणतीही शंका नाही. (प्रतिनिधी) अवैध सावकारीचे गुन्हे दडपतात शेतकरी आत्महत्येत शेतकऱ्याचा अपघात किंवा घातपाताने मृत्यू झाला तरी पोलिसांकडून केवळ आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात येतो. या प्रकारामुळे समाजात होत असलेल्या गुन्ह्यांकडे डोळेझाक होत आहे. सजगता पाळणे गरजेचे आहे. शेतकरी आत्महत्या म्हणून अशा अपघात आणि घातपाताची प्रकरणे समितीसमोर येत आहे. याबाबत गावातील पोलीस पाटील, सरपंच यांनी जागरूक राहून केवळ मदत मिळते, म्हणून अशी प्रकरणे समितीसमोर आणू नये, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना जगण्याची उभारी मिळावी, यासाठी बळीराजा चेतना अभियानातर्फे तालुकास्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी शाळांना दहा हजार रुपए देण्यात येतील.
फायनान्स कंपन्यांची दादागिरी
By admin | Published: August 12, 2016 2:13 AM