घाटंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू आहे. त्याचा फटका शहरातील फेरीवाले व पथविक्रेत्यांना बसला आहे. त्यांना प्रत्येकी दीड हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची भूमिका शासनाने घेतली. त्या अनुषंगाने येथील २७२ फेरीवाले व पथविक्रेत्यांच्या खात्यावर येथील पालिकेने प्रत्येकी दीड हजार रुपये वळते केले आहेत.
राज्यातील सर्वच फेरीवाले व पथविक्रेत्यांचे अर्ज नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय मागविण्यात आले होते. यामध्ये शहरातील २७२ अर्ज ग्राह्य झाले. नऊ अर्ज त्रुटीत असून तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर त्यांनाही आर्थिक साहाय्य वितरित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नगर परिषदेअंतर्गत शहरातील वस्तीस्तर संघाला प्रति संघ ५० हजार रुपयांप्रमाणे चार संघांना निधी वितरित करण्यात आला आहे.
या निधीचे वाटप नगराध्यक्ष नयना ठाकूर, उपनगराध्यक्ष शैलेश ठाकूर, बांधकाम सभापती विकी ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती सुमित्रा मोटघरे, नगरसेवक सीता गिनगुले, मुख्याधिकारी अमोल माळकर, किशोर अंभोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या निधीमुळे पथविक्रेते व फेरीवाल्यांना अडचणीच्या काळात काही प्रमाणात आर्थिक आधार मिळाला आहे.