यवतमाळ : शहरातील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत आर्थिक अनियमितता होत असल्याच्या अनेक तक्रारी मध्यंतरी करण्यात आल्या. आंदोलनेही झाली. मात्र, याचा फारसा परिणाम झाला नाही. याच अनुषंगाने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात कागदपत्रांसह याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेत बँकेच्या माजी अध्यक्षांसह मुख्याधिकारी व इतर संचालक अशा आठ जणांविरुद्ध फौजदारी संहितेअंतर्गत चौकशी करून गुन्हा नोंदविण्याचे आदेश मंगळवारी दिले. शिवाय या कार्यवाहीचा अहवाल पोलिसांना तत्काळ मागितला आहे.
सुरेश शिंदे यांनी महिला सहकारी बँकेतून ५० लाखांचे कर्ज घेतले. त्यांनी याची परतफेड करून बँकेकडे २५ फेब्रुवारी २०१५ ला नो ड्यूज सर्टिफिकेटची मागणी केली. मात्र, तत्कालीन बैंक संचालक व प्रशासनाने हे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे सुरेश शिंदे यांचा संशय बळावला. त्यांनी त्यांच्या खात्याचे स्टेटमेंट, ऑडिट रिपोर्ट व बँक पासबुकची अपडेट एंट्री काढून घेतली. यात बँकेने खोटे दस्त बनवून शिंदे यांच्या खात्यातून २४ एप्रिल २०१५ ला चार लाख आणि १३ मे २०१५ ला ५ लाख काढल्याचे आढळून आले. त्यामुळे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात होऊन कारवाई करावी, अशी याचिका दाखल केली.
प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी बी.एस. संकपाल यांनी याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेत, कागदपत्रांची पडताळणी केली. त्यात प्रथमदर्शनी अफरातफर झाल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. त्यामुळे अवधूतवाडी पोलिसांनी फौजदारी संहिता १५६ (३) अंतर्गत आठ जणांविरोधात विविध कलमान्वये कारवाई करण्याचे निर्देश दिले. चौकशी करून कारवाई केल्यानंतर अवधूतवाडी पोलिसांनी त्याचा अहवाल तत्काळ न्यायालयाकडे सादर करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
न्यायालयाच्या या आदेशामुळे महिला बँकेतील माजी संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी, तत्कालीन शाखा व्यवस्थापक, हिंगणघाट येथील भवानी जिनिंग प्रेसिंगचे भागधारक, बँकेचे दोन अधिकारी या सर्वांच्या अडचणी वाढल्या आहेत. अवधूतवाडी पोलीस या प्रकरणात किती तत्परतेने कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
संगनमताने पैसे काढल्याचा यांच्यावर आहे आरोप
■ बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत कर्ज खात्यातून कर्जदाराला माहीत न होता परस्पर रक्कम काढल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यानुसार बँकेच्या मुख्याधिकारी सुजाता विलास महाजन, माजी अध्यक्ष विद्या शरद केळकर, दीपिका दिलीप गंगमवार, रजनी ठाकरे, जया अनिल कोषटवार, शुभांगी ढोले, सचिन सुभाष मॅडमवार, मंगेश सुभाष मॅडमवार यांच्यासह संचालकांविरुद्ध सुरेश शिंदे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.
■ न्यायालयाने या संदर्भात स्पष्ट आदेश देत पोलिसांना फौजदारी संहितेअंतर्गत कारवाई करीत तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आता या प्रकरणात संबंधितांचा सहभाग पोलिसांकडून कधी उघड केला जातो, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
... तर आर्थिक गुन्हे शाखेकडे जाऊ शकतो तपास
■ महिला सहकारी बँकेतील आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. आरबीआयचे निर्बंधही या बँकेच्या व्यवहारावर आले होते. तत्कालीन संचालक व प्रशासन यांच्याकडून झालेल्या गैरव्यवहारावर अनेकांनी भाष्य केले. प्रत्यक्षात मात्र फौजदारी चौकशी करण्याचे आदेश पहिल्यांदाच झाले आहे.
■ याचिकाकर्त्याने तक्रारीत नमूद केलेली अपहाराची रक्कम जवळपास ७० लाख ४२ हजारांची आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे जाण्याची शक्यता वाढली आहे. गुन्हे शाखेच्या तपासाची गती मात्र अतिशय मंद आहे. आतापर्यंत अनेक मोठी प्रकरणे गुन्हे शाखेत आहेत. यात सर्वसामान्यांच्या पैशाचा अपहार झाला आहे.