नजरा पीक विम्याकडे : बँकांनी दाखविली पाठ, सावकारीचा धंदा तेजीतयवतमाळ : यावर्षी अतवृष्टी आणि नंतर गारपिटीने खरीप व रबी हंगामात मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन केल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. त्यासाठी तो पैशाची जुळवाजुळव करीत आहे. बँकांकडून वेळेवर पैसे मिळेनासे झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सावकारीचा धंदा तेजीत आल्याचे ग्रामीण भागात दिसून येते. शेतकरी मृग नक्षत्रात पेरणी करुन उत्पन्नाची वाट पाहत असतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून याला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकर्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने शेतकर्यांजवळ एक पैसाही शिल्लक राहत नाही. परिणामी शेतकर्यांची खरीप हंगामाच्या तोंडावर पैशासाठी धावपळ सुरू होते. सध्या जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत असून याचा फायदा सावकार घेत आहेत. शासन शेतकर्यांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवितात. परंतु शासकीय योजना शेतकर्यांपेक्षा व्यापार्यांच्या हिताच्या असल्याचे दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही कापसाच्या व इतर पिकांच्या निर्याती संदर्भात शासनाचे धोरण शेतकर्यांसाठी मारक ठरल्याचे दिसत आहे. उपविभागात सिंचन क्षेत्र कमी असून ते वाढविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे शेतकर्यांना कोरडवाहू शेतीवरच आपला उदरनिर्वाह करावा लागतो. बेभरवशाचा पाऊस व मजुरांचे वाढते दर यामुळे परिसरातील शेतकरी तुर्तास गांजला आहे. सोयाबीन पिकानेही हवी तशी साथ न दिल्याने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांचीही कारखान्यांकडून फसवणूक होत असल्याने ते आर्थिक कोंडीत सापडल्याचे चित्र आहे. सध्य स्थितीत शेतमालाचे बाजारमूल्य घसरल्याने शेतकरी आर्थिक डबघाईस आला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या नजरा आता शासनाच्या पीक कर्जाकडे वळल्या आहेत. काही बॅंकांनी कर्ज वाटपास प्रारंभ केला आहे. मात्र शेतकर्यांना या बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. सातबारा व इतर कागदपत्रे मिळविण्यासाठी शेतकरी उन्हातान्हात फिरत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत शेतकर्यांजवळ पैसेच नाही. खरीप पूर्व मशागतीच्या कामाला प्रारंभ झाला. पूर्वी घरच्या बैलाद्वारे नांगरटी केली जायची. मात्र आता बैल परवडत नसल्याने शेतकरी ट्रॅक्टरचा आधार घेत आहेत. त्यासाठी रोख पैसे मोजावे लागत आहे. तसेच ऐनवेळी बी-बियाण्यांची टंचाई होऊ शकते. त्यामुळे अनेक शेतकरी बियाण्यांची खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र पैसा नसल्याने बियाणे उधारीत घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा स्थितीत शेतकरी सावकाराच्या दारात जात आहेत. अव्वाच्या सव्वा व्याज आकारून शेतकर्यांची लुबाडणूक होण्याची शक्यता आहे. एकंदरीत शेतकरी हंगामाच्या सुरुवातीपासूनच आर्थिक जुळवाजुळव करीत आहे. परंतु प्रत्येकालाच यामध्ये यश येताना दिसत नाही. (प्रतिनिधी)
बळीराजाची आर्थिक जुळवाजुळव
By admin | Published: June 04, 2014 12:22 AM