२ आॅक्टोबरचा मुहूर्त : गृहविभागाने काढली अधिसूचनायवतमाळ : शहरालगतच्या लोहारा येथील औद्योगिक वसाहत परिसरात आणि पुसदमधील वसंतनगरमध्ये स्वतंत्र पोलीस ठाणे देण्यात यावे, अशी मागणी मागील तीन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. तसा प्रस्तावही राज्य शासनाच्या गृहविभागाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला गृहविभागाकडून मान्यता मिळाली असून पोलीस ठाणे सुरू करण्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या दोन्ही पोलीस ठाण्यासाठी २ आॅक्टोंबरचा मुहूर्त निश्चित केला आहे. वाढलेली लोकसंख्या आणि गुन्ह्याचे प्रमाण लक्षात घेता या दोन ठाण्यांची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. त्यावेळी असा प्रस्तावही राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. यवतमाळ शहरालगतच्या एमआयडीसी भागात एक स्वतंत्र पोलीस ठाणे असावे जेणे करून या परिसरातील गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवता येईल हा उद्देश या मागे होतो. या ठाण्यासाठी जिल्हा पोलीस दलात कर्मचारी वर्गही राखीव ठेवण्यात आला आहे. आस्थापनेवर एमआयडीसी पोलीस ठाण्याचा कर्मचारी म्हणूनच अनेक जण कार्यरत आहे. असे जवळपास वडगाव रोड ठाण्यात ३५ अधिकारी-कर्मचारी तर शहर ठाण्यात पाच अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाणे सुरू करण्याची औपचारिकताच पूर्ण करावी लागणार आहे. या भागात ठाण्यासाठी जागाही प्रस्तावित असून काही जुजबी काम केल्यानंतर हे ठाणे सुरू होणार आहे. वसंतनगरमध्येही अशीच स्थिती आहे. गणपती आणि दुर्गोत्सवाचा बंदोबस्त असल्याने दोन ठाण्यांची सरचना करताना अडचण येणार आहे. मात्र यातूनही मार्ग काढून लवकरात लवकर इमारत आणि मनुष्यबळ उभे केले जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी दिली. या दोनही पोलीस ठाण्यांना अ दर्जा मिळाला असून येथे पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारीच ठाणेदार म्हणून कार्यरत राहणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
लोहारा, वसंतनगर पोलीस ठाण्यात आता एफआयआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2015 12:13 AM