वणी (यवतमाळ) : तालुक्यातील घोन्सा येथे मंगळवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास अग्नितांडव घडले. अचानक लागलेल्या आगीत घोन्सा येथील बसस्थानक परिसरातील सहा दुकाने जळून खाक झाली. या घटनेत २८ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गावकऱ्यांनी युद्धस्तरावर प्रयत्न करून पहाटे ४:३० वाजता ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या दुकानांमध्ये इलेक्ट्रिक दुकान, बूट हाऊस, पानटपरी, चहा कॅन्टीन, भांड्याचे दुकान, हेअर सलून यांचा समावेश आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी फटाक्याच्या ठिणगीमुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घोन्साजवळ असलेल्या एका कोलाम पोडावरील काही लोक मध्यरात्रीनंतर शेतातून घोन्सा येथील बसस्थानकापुढून जात असताना त्यांना दुकानाला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच आरडाओरड करून नागरिकांना गोळा केले. त्यानंतर नागरिकांनी मिळेल त्या साधनाने पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या घटनेची माहिती वणी येथील नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. पहाटे साडेचार वाजता अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ही आग आटोक्यात आली. तोपर्यंत आगीने परिसरातील सहा दुकानांना आपल्या कवेत घेतले होते. या दुर्घटनेत विठ्ठल आस्कर यांच्या इलेक्ट्रिक दुकानातील संपूर्ण इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. यात त्यांचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले. लागूनच असलेल्या गजानन गावंडे यांचे स्टीलचे दुकानही आगीत सापडले. यात त्यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. त्याच ठिकाणी अनुप येसेकर यांचे सलून होते. तेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून दुकानाची राखरांगोळी झाली. यात त्यांचे अडीच लाखांचे नुकसान झाले. बाजूलाच रमेश काकडे यांचे बूट हाऊस आहे. हे दुकानातील साहित्य माेठ्या प्रमाणावर जळाले. यात काकडे यांचे दोन लाखांचे नुकसान झाले. अरुण सिडाम यांची पानटपरीही आगीत जळाली. यात त्यांचे ५० हजारांचे नुकसान झाले. जवळच असलेल्या सुरेश मांढरे यांची चहा कॅन्टीनही आगीच्या विळख्यात सापडली. यात त्यांचे १० हजारांचे नुकसान झाले.
मुकुटबन पोलिसांनी केला घटनास्थळाचा पंचनामा
दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. पाच दिवस चालणाऱ्या या दीपोत्सवात दररोज रात्री फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे. घटनेच्या रात्रीही बसस्थानक परिसरात फटाके फोडण्यात आले. त्यातीलच एखादी ठिणगी उडाली आणि हळूहळू आगीने रौद्ररूप धारण केले असावे, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, मुकुटबन पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मंगळवारी सकाळी घटनेचा पंचनामा केला. पोलिसांकडून आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.